महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ मार्च । मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूरसह विदर्भात 15 मार्च ते 18 मार्च या काळात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भाच्या सगळ्याच जिल्ह्यांना नागपूर वेधशाळेने यलो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात सोमवारी 13 मार्चला रात्री रिमझिम, तर मंगळवारी 14 मार्चला थोडा मोठा पाऊस झाला. यानंतर आता पुढचे तीन दिवस म्हणजे 15, 16 आणि 17 मार्चला पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके वाचवावीत, असे आवाहन हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केले आहे. तसेच 2023 मध्येही जास्त पाऊस असणार आहे, असा दावाही डख यांनी केला.
शेतकऱ्यांनी शेतीची कामं लवकर आटोपती घेत पिकांची काळजी घेण्याचं आवाहन नागपूर वेधशाळेने केलं आहे. तसंच 17 मार्चनंतरदेखील गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुन्हा पावसाचा इशारा! शेतकऱ्यांनो, ‘या’ पद्धतीनं घ्या पिकांची काळजी
होळीच्या तोंडावरच राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, ज्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक भुईसपाट झालं. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.