Weather Today : पुढच्या ३-४ तासांत राज्याला पावसाचा इशारा; मुंबई, ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ मार्च । ऐन उन्हाळ्यात राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबई, पुण्यासह अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. पण हा पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबई आयएमडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे आहे. तर येत्या ३-४ तासांमध्ये संपूर्ण उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

इतकंच नाहीतर काही तासांमध्ये मुंबई, ठाणे, संपूर्ण विदर्भ, पुणे आणि घाट माथ्यावर पाऊस हजेरी लावेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. खरंतर, आज सकाळपासूनच मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. मुंबई उपनगरातील दहिसर, बोरिवली परिसरात काल रात्रीपासून अधुनमधून रिमझिम पाऊस सुरु आहे. तर ठाणे, दिवा,डोंबिवली, कल्याण,उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण परिसरात गुरुवारी सकाळपासून रिमझिम पाऊसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमन्यांची एकच तारांबळ उडाली आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाउस झाला. नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे या शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे शेतमालाचे मोठे ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती आहे. अशात आता पुढचे २ ते ३ दिवस मेघगर्जनेसह पावसाचे इशारे कायम असणार असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावेल असा इशारा आधीच हवामान खात्याकडून देण्यात आला होता. तो अंदाज आता खरा ठरला असून १५ मार्च ते १८ मार्चपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपीटी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतकंच नाही तर यावेळी वाऱ्याचा वेगही जास्त असेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

पुढच्या ५ दिवसांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता…
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पालघर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या ५ दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस होईल. यावेळी गारपीटही होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *