महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ मार्च । छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी व सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री महाराणी येसूबाई यांच्या समाधीची मूळ जागा शोधण्यात यश आले आहे. सातारास्थित जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था आणि संस्थेशी संलग्न अभ्यासकांनी इतिहासकालीन पत्रे आणि नकाशाच्या आधारे संगम माहुली येथे समाधीची स्थानिश्चिती केली आहे.
राजधानी साताऱ्यातील संगममाहुली हे गाव धार्मिक अंगाने प्रसिद्ध आहे. परंतु अप्रतिम कलाकुसरीने नटलेल्या वास्तूंमुळेदेखील माहुलीचा परिसर हा साताऱ्याचा एक ऐतिहासिक वारसा ठरतो. या कलावारशामध्ये सतराव्या शतकापासून बांधलेली मंदिरे, नद्यांवरचे घाट तसेच राजघराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या समाधींचा समावेश होतो. कालौघात हा वारसा, त्यांचे निर्माते याबद्दलची माहिती विस्मृतीत गेली. त्यामुळे जुन्या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या इतिहासाचे नव्याने संशोधन होत आहे.
मृत्यूपर्यंत साताऱ्यातच
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी व सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांचे इतिहासातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. सुमारे तीस वर्षे औरंगजेबाच्या नजर कैदेत काढल्यानंतर 1719 मध्ये त्यांचे साताऱ्यात आगमन झाले. त्यानंतर मृत्यूपर्यंत त्यांचे वास्तव्य साताऱ्यातच होते.
त्यांच्या मृत्यूची तारीख अजून तरी उपलब्ध झालेली नाही. परंतु 1729 च्या दरम्यान त्यांचा साताऱ्यात मृत्यू झाला असावा असे अभ्यासकांचे मत आहे. त्यानंतरच्या काळात त्यांची घुमटी म्हणजेच समाधी माहुली येथे बांधण्यात आली असाही उल्लेख सापडतो.
समाधीचे स्थान विस्मृतीत
जवळपास तीनशे वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात राजघराण्यातील इतर समाधींप्रमाणे येसूबाईंच्या समाधीचे स्थानदेखील विस्मृतीत गेले. येसूबाईंच्या समाधीचा शोध घेण्याचे काम ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी केले होते. त्यापैकी बेंद्रे यांनी 1970 च्या दशकात येसूबाईंची समाधी कृष्णा-वेण्णा संगमाच्या नदीपात्रातील छ. शाहू महाराजांच्या समाधीनजीकच असावी, असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार त्या ठिकाणी उत्खननदेखील झाले होते. परंतु ठोस असे काही आढळून आले नव्हते.
इतिहास संशोधकांना अखेर यश
साधारणतः सहा वर्षांपूर्वी माहुलीतील हरिनारायण मठाच्या कागदपत्रात येसूबाईंच्या समाधीचा नामोल्लेख आढळून आला होता. परंतु त्याची स्थाननिश्चिती होत नव्हती. मौखिक माहिती, पुराभिलेखागार कार्यालयाकडून मिळालेले दस्तावेज, माहुलीच्या हरिनारायण मठाच्या कागदपत्रांच्या आधारावर शोध घेण्याचे काम सुरू होते. एका जुन्या नकाशाच्या आधारे समाधीचे स्थान निश्चित करण्यात इतिहास संशोधकांना अखेर यश मिळाले आहे.
ऐतिहासिक वारसा दृष्टिपथात
संगम माहुलीत पूर्वाभिमुखी एका चौरस चौथर्यावर अष्टकोनी आकारात बांधकाम आहे. या वास्तूचा चौथरा राजचिन्हांनी सजवलेला असून कालौघात वास्तूच्या घुमटाचे नुकसान झाले आहे. कलाकुसरीवरून ही समाधी छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराणीची आहे हे सिद्ध झाल्यामुळे सातारच्या इतिहासातील फार मोठा ऐतिहासिक वारसा दृष्टिपथात आलेला आहे.
कागदपत्रे सापडली
समाधीचा शोध ज्या इनामपत्राच्या आधारावर घेतला गेला ती माहुलीस्थित हरिनारायण मठाची ऐतिहासिक कागदपत्रे आहेत. त्यामध्ये 5 नोव्हेंबर 1756 रोजीचे पत्र आहे. या पत्राची सुरुवात श्रीमंत महाराज मातोश्री आईसाहेब या नावाने होते. 15 डिसेंबर 1749 रोजी श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांचे निधन झाले.
त्यानंतर सातारची राजकीय स्थिती ही अत्यंत धामधुमीची होती. छत्रपती शाहू महाराजांच्या पश्चात महाराणी ताराबाई यांचा नातू रामराजे विधीवत सातारच्या गादीवर आले असले तरी काही काळ सर्व सूत्रे महाराणी ताराबाईंच्याच हातात होती.
समाधीच्या स्थानावर शिक्कामोर्तब
महाराणी ताराबाईंनी संगम माहुलीतील जुन्या मंदिराच्या नजीकच सुमारे एक बिघा इतकी जमीन देऊ केली. या जमिनीच्या चतु:सीमेत येसूबाईंची समाधी, असा स्पष्ट उल्लेख येतो. या परिसरात राजघराण्यातील आणखी काही समाधी असल्यामुळे येसूबाईंच्या समाधीची स्थाननिश्चिती होत नव्हती. परंतु एका जुन्या नकाशाच्या आधारावर येसूबाईंच्या समाधीच्या स्थानावर शिक्कामोर्तब झाले आहे.