Farmers Long March: सरकारच्या आश्वसनानंतर शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्च स्थगित

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ मार्च । शेतकऱ्यांचं लाल वादळ अखेर थांबलं आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च स्थगित करण्यात आला आहे. शेतकरी नेते जे पी गावित यांनी ही माहिती दिली आहे.दरम्यान शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी दाखल होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना नाशिकला सोडण्यासाठी बसेस आणि दोन रेल्वेची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

सध्या दहा गाड्या आंदोलनस्थळी दाखल झाल्या आहेत. शेतकरी माघार घेतील तेव्हा याच गाड्यातून आम्ही त्यांना नाशिकला सोडणार आहे अशी प्रतिक्रिया कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या लॉन्ग मार्चमध्ये पुरुष शेतकऱ्यांप्रमाणे महिला शेतकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.

पुंडलिक जाधव या 55 वर्षीय शेतकऱ्याचा काल मृत्यू झाला. या मृत्यूनंतर त्यांच्या गावाकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आमच्या मागण्या अगोदरच मान्य केल्या असत्या आणि त्याची अंमलबजावणी केली असती तर ही वेळ आली नसती अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच आमचा शेतकरी बांधवाचा मृत्यू झाला, त्याला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी देखील मागणी पुंडलिक जाधव यांच्या गावकऱ्यांनी केली आहे.कांद्याला हमीभाव, कर्जमाफी, अवकाळीमुळे झालेलं नुकसान अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लाँग मार्चची वाट धरली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे, तसंच बैठकीच्या फेऱ्याही झाल्या आहेत. मात्र तरीही शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम होते. परंतु आता ही आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *