Maharashtra Politics: राज्यात पुन्हा मुख्यमंत्री बदलणार का? बच्चू कडूंचं सूचक विधान

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मार्च । राज्यात सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी एकत्रित येत राज्यात सरकार स्थापन झालं. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा तर शिवसेना शिंदे गटाला 48 जागा असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे. या विषयावर चर्चा सुरू झाल्यानंतर बावणकुळे यांचा तो व्हिडिओ देखील सोशल मिडियावरून हटवण्यात आला. या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

अशातच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

बच्चू कडू बोलताना म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे की, चुकून त्यांनी वक्तव्य केलं हे तपासलं पाहिजे. आम्ही शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. युतीचं अजून आमचं काही ठरलं नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची, नाही करायची, किती जागा देणार, नाही देणार त्याचं अजून काही ठरलेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते.

दरम्यान येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत राहणार का याबाबत विचारे असता त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, पुढच्या दीड वर्षात काय होणार हे आत्ताच काही सांगता येणार नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले आहेत. तीन वेळा शपथविधी झालेत. त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार हे आत्ताच सांगता येणार नाही. कडू यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा मुख्यमंत्री बदलणार का? असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *