‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात; पन्हाळ गडाच्या तटबंदीवरून कोसळला तरूण

Loading

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मार्च । महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कोल्हापुरातील पन्हाळगडावर या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. ही शूटिंग सुरू असताना 19 वर्षांचा एक तरुण किल्ल्याच्या तटबंदीवरून 100 फूट खाली कोसळला. सूत्रांच्या माहितीनुसार हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला शहरातील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी तरुणाचं नाव नागेश खोबरे असं आहे. शनिवारी रात्री जवळपास नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. महेश मांजरेकर हे गेल्या काही दिवसांपासून पन्हाळगडावर त्यांच्या चित्रपटाची शूटिंग करत आहेत. शनिवारी रात्री शूटिंगदरम्यान किल्ल्यावरील तटबंदीवरून तरुणाचा तोल सुटला आणि तो 100 फूट खाली कोसळला.

पन्हाळगडावरील शूटिंगसाठी काही घोडे त्याठिकाणी आणले होते. याच घोड्यांची देखभाल नागेश करत होता. फोनवर बोलून झाल्यानंतर तो सज्जा कोटीच्या उत्तर दिशेला असलेल्या तटबंदीवरून खाली येत असताना त्याचा तोल ढासळला. तिथे उपस्थित असलेल्यांनी ताबडतोब त्याची मदत केली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

खाली कोसळलेल्या नागेशला दोरीच्या सहाय्याने वर आणलं गेलं. या घटनेत नागेशच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला आहे. त्याच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जवळच्या एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं. याप्रकरणी अद्याप महेश मांजरेकरांची प्रतिक्रिया समोर आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *