Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर पुन्हा दगडफेक; रात्रीचा प्रवास ठरतोय धोकादायक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ मार्च । मृद्धी महामार्गावरील रात्रीचा प्रवास आता धोकादायक ठरतोय. कारण गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) दगडफेकीच्या घटना सतत घडताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता पुन्हा अशीच काही घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर वैजापूरच्या सुराळा शिवारात पुन्हा एकदा दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून, ज्यात एक मुलगा गंभीर झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळील समृद्धी महामार्गावरील धावत्या प्रवासी वाहनावर अज्ञात व्यक्तींनी तुफान दगडफेक करण्यात आली होती.

मोठा गाजावाजा करत सरकराने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते. मात्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून हा हायवे सतत कोणत्याना-कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे. आधीच अपघातांच्या मालिकामुळे चर्चेत असलेला हा महामार्ग आता रात्रीच्यावेळी होणाऱ्या वाहनांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. सोमवारी पुन्हा अशीच काही घटना समोर आली आहे. राजस्थान येथील भाविक हे शिर्डी येथून दर्शन घेऊन समृद्धी महामार्गावरून जीपने छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना, वैजापूरच्या सुराळा शिवारात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला असून, यात दोन जण जखमी झाले आहे. ज्यात एक मुलगा गंभीर झाला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून रात्रीचा प्रवास धोकादायक ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

यापूर्वी देखील झाली दगडफेक…
यापूर्वी देखील 13 मार्च रोजी असाच काही प्रकार समोर आला होता. एका कुटुंबातील सदस्य शिर्डीहून नागपूरकडे प्रवास करत होते. दरम्यान त्यांची कार छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारातील समृद्धी महामार्गावर येताच धावत्या कारवर अचानक अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली होती. ज्यात एक महिला प्रवासी जखमी झाल्या होत्या. तसेच त्यांच्या वाहनाच्यामागे असलेल्या वाहनावर देखील यावेळी दगडफेक झाली होती. दरम्यान याची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा अशीच काही घटना समोर आली आहे.

लुटमारीचीही घटना…
समृद्धी महामार्गावरून रात्रीचा प्रवास करणाऱ्या वाहनांवर दगडफेक करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत असतानाच, दोन आठवड्यापूर्वी याच मार्गावर लुटमारीचीही घटना देखील समोर आली होती. समृद्धी महामार्गावर एका टोळक्याने वाहन चालकाला बंदूक, तलवारीचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार समोर आला होता. तर या वाहनचालकाच्या दोन अंगठ्या, रोख 65 हजार रुपये असा एकूण 85 हजारांचा ऐवज लुटला होता. एकापाठोपाठ घडलेल्या अशा घटनांनी आता समृद्धी महामार्गावरुन रात्रीचा प्रवास धोकादायक ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *