वयामुळे नोकरीची संधी हुकणार ! चार वर्षांत नोकर भरतीच नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३ एप्रिल । कोरोना, तसेच अन्य कारणांनी शासकीय नोकर भरती पुढे ढकलण्यात आल्याने, गेल्या तीन-चार वर्षांत नोकर्‍यांची संधी उपलब्ध झाली नाही. या कालावधीचा विचार करता वय वाढलेल्या उमेदवारांना शासकीय नोकर्‍यांत संधी देण्यासाठी राज्य सरकारने 17 डिसेंबर 2021 आदेश काढला. या शासन निर्णयाची 31 डिसेंबर 2023 पर्यंत अंमलबजावणी करण्याची मागणी वंचित उमेदवारांनी केली आहे.

याबाबत वंचित उमेदवारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन सेवेतसरळ सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत शिथिलता देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने 3 मार्च 2023 रोजी शासन निर्णय काढलेला आहे. त्यात दोन वर्षे वयोमर्यादेची सवलत देण्यात आल्याचे दिसते. मात्र, हा शासन निर्णय ढोबळ पद्धतीचा दिसून येतो.

कोरोन व अन्य कारणांमुळे नोकरभरती न झाल्याच्या परिपूर्ण कालावधीचा त्यात विचार केलेला नाही. यापूर्वी 17 डिसेंबर 2021 रोजी काढलेल्या शासन निर्णयात 1 मार्च 2020 ते डिसेंबर 2021 या कालावधीत वयाधिक ठरणारे उमेदवार शासन सेवेच्या नियुक्तीसाठी व जाहिरातीसाठी पात्र असतील, असे म्हटलेले आहे. कोरोना अगोदरच्या व नंतरच्या 4 वर्षे कालावधीत वर्ग 3 पदाची किंवा जिल्हा परिषद भरती झालेली नाही. तसेच, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही नियमित झालेल्या नाहीत.

या बाबीचा व उपलब्ध न झालेल्या संधीचा आणि नोकरीसाठी परिश्रम घेत असलेल्या सर्वांच्या हिताचा विचार होणे आवश्यक आहे. सन 2021 च्या शासन निर्णयाप्रमाणे वयाधिक कालावधी डोळ्यासमोर ठेवून 2023 अखेर शासकीय सेवेच्या जाहिरातीसाठी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

एक आठवड्याची मुदतवाढ द्या
राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांसाठी 3 एप्रिल 2023 ही अंतिम मुदत देण्यात आलेली असून, ती आज संपत आहे. या परीक्षांपासून कोणीही उमेदवार वंचित राहू नयेत, यासाठी एक आठवड्याची मुदतवाढ मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *