महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ एप्रिल । बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी प्रोजेक्ट के या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान बिग बी अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे विश्रांती घेण्याचा आणि चित्रीकरणासह इतर कामांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अमिताभ बच्चन हे सध्या विश्रांती घेताना दिसत आहेत. अमिताभ यांची प्रकृती ठीक होण्यासाठी आणखी काही दिवसांचा वेळ लागणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी मी सध्या विश्रांती घेत आहे. लवकरच पूर्णपणे बरा होईन, असे म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन हे एका फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक करताना दिसले होते. त्यानंतर आता नुकतंच ते पुन्हा शूटींग कधी सुरु करणार याबद्दलची नवी माहिती समोर आली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या एका जवळच्या मित्राने ई-टाईम्सशी बोलताना याबद्दलची अपडेट दिली. “बिग बींना लवकरच पुन्हा शूटींग सुरु करण्याची इच्छा आहे. पण वयामुळे त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे. त्यांची प्रकृती ठिक होण्यासाठी अजून थोडा वेळ लागू शकतो”, असे त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितले.