महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – मुंबई – टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ‘ट्राय’ने मोबाईल क्रमांक 10 ऐवजी 11 अंकी असणार असल्याचे वृत्त आधी दिले होते. मात्र, रविवारी ‘ट्राय’ने याबाबत स्पष्टीकरण दिले असून, ‘ट्राय’ने मोबाईल क्रमांक इथून पुढे ही पूर्ववत 10 अंकीच असतील, असे म्हटले आहे.
‘ट्राय’कडून सांगण्यात आले की, आम्ही मोबाईल सर्व्हिससाठी 11 अंकी क्रमांक करण्याबाबत अद्याप कोणतीही योजना तयार केलेली नाही.आम्ही केलेल्या शिफारशींतून चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे ‘ट्राय’ने म्हटले आहे. अकरा अंकी मोबाईल क्रमांकाला आम्ही मान्यता दिलेली नाही. लँडलाईनवरून मोबाईलवर फोन लावताना यूजर क्रमांकाच्या आधी शून्य लावावा लागेल एवढेच आम्ही म्हटले होते.
मोबाईल क्रमांकाच्या आधी शून्य लावल्याने क्रमांकाच्या अंकात कोणतीच वाढ होणार नाही. डायलिंग पॅटर्नमधील या बदलामुळे भविष्यात 2,544 दशलक्ष अतिरिक्त नंबर उपलब्ध करून दिले जाऊ शकतील. भविष्यातील गरजा पूर्ण करण्याच्या द़ृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
लँडलाईन आणि मोबाईल सेवांसाठी एकीकृत अथवा एकल क्रमांक योजनेची तूर्त आवश्यकता नाही. लँडलाईन टू लँडलाईन, मोबाईल टू लँडलाईन किंवा मोबाईल टू मोबाईल कॉल्समध्ये बदल करण्याची सध्या गरज नाही.
लवकरच नवा नंबरिंग प्लॅन
‘ट्राय’ने राष्ट्रीय पातळीवर लवकरच नव्या नंबरिंग प्लॅनची गरज मात्र बोलून दाखवली आहे. न वापरलेल्या क्षमता मोकळ्या करून भविष्यातील मोबाईल सेवेसाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी म्हणून हे आवश्यक असेल, असेही ‘ट्राय’ने म्हटले आहे.
ऑपरेटर्सकडून विरोध
प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ऑपरेटर्सकडून अकरा अंकी नंबरिंग पद्धतीला विरोध करण्यात आला होता. तसे केल्यास मोठ्या प्रमाणावर यंत्रणेचे अद्ययावतीकरण करावे लागेल. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अद्ययावत करावे लागतील. याचे ओझे ऑपरेटर्सवरच येईल. ग्राहकांमध्येही संभ्रम निर्माण होईल, असे ऑपरेटर्सचे म्हणणे होते.
