महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ एप्रिल । बदलत्या वातावरणामुळे कधी ऊन तर कधी पाऊस, असे चित्र राज्यात सध्या अनुभवयास मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे आजारांचा प्रसार होतो. या उष्णतेचा फटका राज्यासह मुंबईला बसला असून उष्माघाताचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या एका महिन्यात उष्माघाताच्या ७२ संशयित रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे; तर राज्यात या वर्षी एका रुग्णाचे निदान झाले असून ३५७ संशयित रुग्ण नोंदले गेले आहेत.
गेल्या काही वर्षांत जगभरातील तापमानात बदल जाणवू लागला आहे. उष्माघात हा एक गंभीर आजार असून, शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक वाढले; तर सूर्याच्या उष्णतेपुढे सामान्य पातळी ठेवणे अशक्य होते. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. राज्यात उष्णता विकार प्रतिबंध व नियंत्रणासाठी विविध पातळीवर दरवर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येतो. दरम्यान, राज्यात उष्माघातामुळे २०१५ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ७६ जण दागवल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली; तर २०१५ ते एप्रिल २०२३ या कालावधीत उष्माघाताचे १,७९० रुग्ण आढळले आहेत.
असा बचाव करा
पुरेसे पाणी प्या.
हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा.
उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.
उन्हात जाताना टोपी/ हॅट खाली ओलसर कपडा ठेवा.
ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.