महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ एप्रिल । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर पत्रकार परिषद घेत या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं सांगितलं. आता या गोष्टीचा तुकडा पाडा, कारण नसताना गैरसमज करू देऊ नका. ४० सह्या झालेल्या नाहीत आणि घेतलेल्या नाहीत. जी संभ्रमावस्था निर्माण केली जातेय, ती थांबवा. आमची सहनशिलता संपते, त्याचा अंत होऊ देऊ नका अशी विनंती अजित पवार यांनी केली.
आम्ही सर्वजण राष्ट्रवादीतच राहणार आहे. तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? कोणत्याही गोष्टीत तथ्य नाही. ४० आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. कामानिमित्त आमदारांनी माझी भेट घेतली. आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत राहू असं अजित पवार यांनी सांगितलं
ज्या काही चर्चा सुरू आहेत त्याबाबत राष्ट्रवादीच्या कोणत्या जबाबदार माणसाने सांगितलं का? राष्ट्रवादीची स्थापना स्वाभिमानातून झालीय आणि जोपर्यंत जिवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादीत राहणार आणि काम करणार असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी संतापही व्यक्त केला. ट्विटरवरून कव्हर पेज काढलं याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘ट्विटर पेजला माझं आधी उपमुख्यमंत्री असं पद होतं. तेवढं काढलं, त्यानंतर बाकीचं आहे तसंच आहे.’
आमचं वकिलपत्र घेऊ नका, अजितदादांनी संजय राऊतांना फटकारलं
दरम्यान, इतर पक्षाच्या नेत्यांकडून अजित पवार भाजपमध्ये जाणार अशी वक्तव्ये केली जात आहेत त्यांचाही समाचार अजित पवार यांनी घेतला. ते म्हणाले की, इतर पक्षांचे प्रवक्तेसुद्धा राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलतायत. तुम्ही ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करता त्याबद्दल बोलता. तुम्ही ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला कोट करून काहीही नका बोलू. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहे. आमचं वकीलपत्र दुसऱ्याने घेण्याचं कारण नाही.
आम्ही महाविकास आघाडीच्या सभासाठी नागपूरला गेलो होतो. येताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच विमानाने आलो. त्यानंतर नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 12 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आम्ही नवी मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये जाऊन श्री सदस्यांची भेट घेतली. मुळात या कार्यक्रमात निष्पाप लोकांचा बळी गेला. तो दुपारी घेता आला असता. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमाला सदस्य हे सकाळी सुद्धा हजर होत असतात. आम्ही सगळ्यांना भेटलो. आम्हाला त्यात कोणतेही राजकारण करायचे नाही. हा कार्यक्रम राजभवन किंवा बंदिस्त हॉलमध्ये सुद्धा घेता आला असता.
अजित पवार यांनी याआधीही सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या. तेव्हा ते म्हणाले होते की, ज्या काही मीडियामध्ये चालत आहे सगळ्या अफवा आहे . मी अनेकदा ट्विट करून सांगितले की ते साफ खोटे आहे. कोणी सह्या केल्या मला माहित नाही. मी माझं नेहमी प्रमाणे काम करत आहे.