Ajit Pawar : मी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार ; अजित दादांनी संशयाचं धुकं हटवलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ एप्रिल । राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना पूर्णविराम देत राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘आम्ही आमचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत आहोत आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत पक्षाचंच काम करणार. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनात कोणताही संभ्रम न ठेवता निश्चिंत राहावे,’ असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार हे राष्ट्रवादीतील एका गटासह भाजपसोबत जातील, अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यांची भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा सुरू असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय होईल, असंही बोललं जात होतं. मात्र आता अजित पवार यांनी आज नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील नागरिकांच्या मृत्यूला सरकारला जबाबदार धरत टीकास्त्र सोडलं आणि नंतर पत्रकारांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार यांचा पत्रकारांशी संवाद, हे आहेत १० ठळक मुद्दे :

– सध्या आमच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये यत्किंचितही तथ्य नाही. सर्व बातम्या निराधार आहेत.

– कारण नसताना माझ्याबद्दल आणि माझ्या इतर सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक सुरू आहे.

– मी ४० आमदारांच्या सह्या घेतल्या, ही बातमीही खोटी आहे.

 

– आम्ही परिवार म्हणून काम करतो, यापुढेही पक्षाचं काम सुरू ठेवणार.

– कार्यकर्त्यांनी संभ्रमित न होता आपआपल्या भागात पक्षवाढीसाठी काम सुरू ठेवावं.

– मला आज काही आमदार भेटले. ते त्यांच्या मतदारसंघातील कामांबाबत भेटले, अन्य कोणताही हेतू नाही.

– राज्यासमोर बेरोजगारी, महागाई यांसारखे महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा चर्चा घडवून आणल्या जात आहेत.

– मी राष्ट्रवादी सोडून जाणार नाही, हे पत्रकारांना स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?

– महाविकास आघाडीसोबत राहून ही आघाडी मजबूत करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतलेला आहे.

– मी ट्विटरवरून पक्षाचं चिन्ह हटवलेलं नाही. आता काय कपाळावर पक्षाचं चिन्ह लावून फिरू का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *