महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ एप्रिल । राज्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकारण चांगलेच पेटून उठले होते. मात्र त्यानंतर स्वतः अजित पवारांनी या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. आता त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गायब असल्याचा दावा ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आला आहे.
सामनात म्हटले आहे, आश्चर्य असे की, कालचे बाहुबली फडणवीस राज्यातील या सगळय़ा उपक्रमात पूर्ण बेपत्ता आहेत. त्यामुळे सगळय़ात मोठी उलथापालथ ही भाजपअंतर्गत सुरू आहे की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे. भाजपकडे स्वतःचे असे काहीच नाही. दुसऱ्या पक्षांतले लोक उधार घेऊन ते स्वतःचा पक्ष चालवीत आहेत. कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस पाडून स्वतःचे घर भरायचे.
यंत्रणांची सुरामारी
सामनात म्हटले आहे, भाजपकडे स्वतःचे असे काहीच नाही. दुसऱ्या पक्षांतले लोक उधार घेऊन ते स्वतःचा पक्ष चालवत आहेत. कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून स्वतःचे घर भरायचे. काँग्रेसवरही त्यांची वाईट नजर आहेच. धमक्या, दबाव आणि तपास यंत्रणांची सुरामारी यामुळे महाराष्ट्रासह देशात लोकशाही तसेच कायद्याचे राज्यच संपवून टाकले.
वावड्या आणि रेवड्या
सामनात म्हटले आहे, अजित पवारांच्या बाबतीत वावड्या आणि रेवड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम त्यांनीच केले. महाराष्ट्राला अस्थिर, बदनाम व गोंधळ निर्माण करण्याचे हे कारस्थान आहे. बरे झाले, अजित पवार यांनीच हे कारस्थान उधळून लावले. त्यामुळे तूर्तास तरी या विषयास पूर्णविराम मिळाला आहे.