महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ एप्रिल । राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार यावरून मोठी खलबतं सुरू होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे श्री क्षेत्र देहू येथे एका कीर्तन सोहळ्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. याचा प्रत्यय यानिमित्ताने पुन्हा एकदा आला. शरद पवार यांचा मंगळवारी पुणे दौरा होता. या दौऱ्यात त्यांनी सकाळी पुरंदर येथील कार्यक्रम सकाळी उरकल्यानंतर त्यांनी दुपारच्या सुमारास देहू येथील कीर्तन सोहळ्यास हजेरी.लावून काही वेळ हे कीर्तन ऐकले. त्यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके ही पवारांच्या बाजूला बसून होते. पुण्यातील देहूत त्रैमासीक कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षणाच्या समारोपाच्या निमित्ताने ते देहूत आले आहे. या प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थींनी कीर्तन सेवा केली. तब्बल एक तास शरद पवारांनी एकाग्रतेने हे कीर्तन ऐकलं आणि त्याला दादही दिली.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट फोडून भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. अजित पवार भाजपसोबत गेल्यास काय होणार, या भीतीने महाविकास आघाडीच्या गोटात चिंता निर्माण झाली होती. मात्र, राजकारणातील अनेक पावसाळे पाहिलेल्या शरद पवार यांनी साधी मुंबईत येण्याची तसदीही घेतली नव्हती. ते ठरल्याप्रमाणे आपले नियोजित दौरे करत होते. मंगळवारी शरद पवार हे बारामतीमध्ये कुस्तीचे सामने पाहायला गेले होते. बारामतीत शारदा प्रांगण येथे भरलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात ते सोमवारी कुस्ती पाहण्यात दंग असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा दावा फेटाळून लावला होता. जी काही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्या कोणाच्याही मनात नाही. आमच्या प्रत्येकाच्या मनात पक्षाला शक्तिशाली करण्याशिवाय दुसरा कोणताही विचार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले होते.