महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ एप्रिल । श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आज (बुधवार) दिल्ली उच्च न्यायालयानं (Delhi High Court) मोठा निर्णय दिला. या प्रकरणी दाखल आरोपपत्रातील मजकूर दाखवण्यास किंवा त्याची माहिती देण्यास सर्व वृत्तवाहिन्यांना न्यायालयानं मनाई केलीये.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दाखल केलेल्या आरोपपत्रातील गोपनीय माहिती प्रकाशित करणं, छापणं आणि प्रसारित करणं, तसंच या प्रकरणाच्या तपासादरम्यान गोळा केलेली इतर सामग्री प्रसारित करण्यापासून प्रसिध्दी माध्यमांना प्रतिबंधित करावी, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली पोलिसांनी दाखल केली होती.
यावर न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सर्व वृत्तवाहिनींनी श्रद्धा वालकर खून प्रकरणाचे आरोपपत्रातील मजकूर प्रदर्शित करु नये किंवा दाखवू नये, असे निर्देश न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांनी केंद्र सरकारला दिले आहेत.
गेल्या वर्षी 18 मे रोजी आफताब पूनावालानं दिल्लीच्या मेहरौली भागात त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली होती. त्यानं श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करुन फ्रीजमध्ये तीन आठवडे ठेवले आणि नंतर दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी 24 जानेवारी रोजी 6,629 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं.