आरटीईचे सर्व्हर बदलले : सोडतीनंतर 94,700 प्रवेश, राज्यभरातून साडेतीन लाखांपेक्षा अधिक अर्ज

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ एप्रिल । शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) सुरू असलेली ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. प्रवेशाची सोडत जाहीर झाल्यानंतर अॅडमिट कार्ड डाऊनलोड करताना पालकांना सर्व्हर बंद पडल्याने त्रास सोसावा लागला. आता शिक्षण विभागाने सर्व्हर बदलले असून प्रक्रिया सुरळीत झाल्याचा दावा शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी केला.

समाजातील आर्थिक दुर्बल तसेच वंचित घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राज्यभरातील खासगी शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा या २५ टक्के राखीव जागांसाठी राज्यभरातून ३ लाख ६६ हजार ५४८ पालकांनी अर्ज दाखल केले. सोडतीनंतर ९४ हजार ७०० बालकांचे प्रवेश झाले. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने मार्चपासून खुली केली होती. तेव्हापासून संबंधित लिंकवर पालकांना तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले. तांत्रिक अडचणींचा हा पाढा ५ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या सोडतीनंतरही कायम राहिला.

गरज असल्यास प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देणार
प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी म्हणाले, आरटीई प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी जे सर्व्हर वापरले जात होते त्यामध्ये बिघाड झाला होता. परिणामी सुरुवातीच्या टप्प्यात पालकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षण विभागाने नुकतेच सर्व्हर बदलले. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एकही तक्रार नाही. प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडेल. तसेच अंतिम मुदतीनंतर आवश्यकता भासल्यास योग्य ती मुदतवाढही दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *