महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ एप्रिल । एसटी महामंडळाच्या ताफ्यात दुसर्या टप्प्यातील इलेक्ट्रिक शिवाई बस येण्यास सुरुवात झाली आहे. दुसर्या टप्प्यातील पहिली बस नुकतीच एसटीच्या पुणे विभागाच्या ताफ्यात दाखल झाली असून, पुणे-औरंगाबाद मार्गावर धावणार आहे. या बससह एकूण 14 बस पुण्यात येत्या दोन-तीन दिवसांत पाहायला मिळतील.
राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सोमवारी दुसर्या टप्प्यातील पहिली ई-शिवाई बस दाखल झाली. ही गाडी पुण्यातील विभागीय कार्यालयाच्या परिसरात आणण्यात आली होती. या वेळी महामंडळाच्या उपसरव्यवस्थापिका यामिनी जोशी यांनी पाहणी केली. त्यांच्यासह पुणे विभागातील एसटीचे अधिकारी आणि बस कंपनीचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. या बस बंगळुरू येथील कंपनीत तयार होत असून, त्या हळूहळू एसटीच्या ताफ्यात दाखल केल्या जात आहेत. सध्या सातारा येथे आणखी 4 बस असून, त्या सोमवारी रात्री उशिरापर्यंत पुण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ई-शिवनेरीसुद्धा लवकरच
एसटीच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक शिवनेरी बससुध्दा दाखल होणार आहेत. नुकत्याच काही ई-शिवनेरी मुंबईत दाखल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तशाच नवीन ई-शिवनेरी पुण्यातसुध्दा लवकरच दाखल होणार आहेत.
चार्जिंगसाठी लागणारा कालावधी…
डीसी चार्जर – 2 तास
एसी चार्जर – 4 तास
एका चार्जमध्ये – 300 किलोमीटर धावते
बॅटरी – 180 केव्ही.
नव्या ई-शिवाईत या सुविधा
अनाउन्समेंट सिस्टिम (चालकासमोर माईक)
सात सीसीटीव्ही
प्रवाशांचे सामान ठेवायला जागा
प्रशस्त आसनव्यवस्था
पॅनिक बटण सुविधा
फूट लॅम्प
प्रत्येक आसनाजवळ रीडिंग लाइट
पावरफुल एसी
प्रवाशांकरिता गाडीमध्ये टीव्ही
थांब्याची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रिक लाइट फलक