अवकाळी : राज्यात आणखी दोन दिवस गारपिटीचा मारा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ एप्रिल । राज्यात विदर्भात बुधवारपासून (26 एप्रिल) दोन दिवस काही ठिकाणी पावसाचा यलो व ऑरेंज तर नाशिक जिल्ह्यासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट मुंबई व नागपूर वेधशाळेने जाहीर केला आहे.

विदर्भात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी. तर उर्वरित राज्यात 30 ते 40 किमी राहील. मध्य प्रदेश व सभोवतालच्या परिसरावर 900 मीटर उंचीवर गोलाकार वाऱ्यांची स्थिती असून ती महाराष्ट्रापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा आणि वारा खंडितता प्रणाली कायम असल्याने पावसाचे वातावरण आहे.

नाशिकलाही फटका

नाशिक जिल्ह्यात 26 ते 27 एप्रिलदरम्यान अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा, गारपीट राहणार असल्याचा अंदाज इगतपुरी भात संशोधन केंद्र व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. अर्धापूर तालुक्यात वादळी गारपिटीने पपईची बाग आडवी झाली.

गारपीट, अवकाळी पाऊस

नांदेड, हिंगाेली, परभणी व बीड, जालना जिल्ह्यात मंगळवारी गारपीट व अवकाळी पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील कंधार व किनवट तालुक्यात वीज पडून ५ जनावरे दगावली. जवळा येथे घरावरील पत्रे उडाल्याने अमोल गोडबोले (८) जखमी झाला. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील काही गावांत 20 मिनिटांच्या वादळी वाऱ्यामुळे हजारो केळीची झाडे आडवी झाली.

एप्रिल महिना तीव्र उन्हाशिवाय गेल्याचे दिसत आहे. हवामान खात्याने पुढील आठवड्यातील आपल्या अंदाजात देशात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. उन्हाळ्यात मार्च ते जूनपर्यंत उष्णतेची लाट असते. फार कमी बाबतीत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती जुलैमध्ये मान्सून उशिरा सुरू झाल्यास असते.

बुधवारपासून पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्य राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मध्य भागात पश्चिम विक्षाेभाचा प्रभाव जाणवू शकतो. हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत केरळ, तेलंगणमध्ये २७ एप्रिलला आणि अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात 28 एप्रिलला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, तेलंगण, प. बंगाल, सिक्कीम, ओडिशा, विदर्भ, दक्षिण छत्तीसगडमध्ये पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *