सोलापुरात करोना विषाणूचा कहर दिवसागणिक वाढत चालला; रूग्णसंख्या ११३५

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – सोलापूर – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – अठरापगड जाती-धर्माच्या, गरीब श्रमिकांच्या, झोपडपट्टय़ा, चाळींनी वेढलेल्या सोलापुरात करोना विषाणूचा कहर दिवसागणिक वाढत चालला आहे. सोलापुरात ५२ दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजाराचा टप्पा पूर्ण करीत ११३५ पर्यंत गेली असताना मृतांचा आकडाही शंभरी गाठण्याच्या बेतात आहे. मागील आठवडाभरात रुग्णांची व मृतांची संख्या अधिकच झपाटय़ाने वाढत असून हा वेग कमी न होता आणखी किती वाढेल, याची सर्वाना चिंता लागली आहे. करोनाचा विषाणू आता शहरातील पूर्व आणि दक्षिण भागानंतर उत्तर आणि पश्चिमेसह संपूर्ण गावठाण भागात तसेच ग्रामीण भागात फैलावत आहे.

सोलापुरात काल दिवसभरात ४० नवे करोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर पुन्हा रात्रीत नवे ५५ नवे रूग्ण आढळून आले. त्यामुळे आता एकूण रूग्णसंख्या ११३५ वर पोहोचली आहे. यात ९४ मृतांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत रूग्णालयात उपचार घेऊन ४६९ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. आज गुरूवारी सकाळी करोनाशी संबंधित २६१ चाचणी अवास्तव प्राप्त झाले असता त्यात नवे ५५ रूग्ण बाधित निघाले. यात ३८ पुरूष व १७ महिला आहेत. जिल्हा ग्रामीण भागात बार्शी तालुक्यात नव्याने तीन बाधित रूग्ण सापडले असून त्यामुळे बार्शीतील रूग्णसंख्या १५ वर पोहोचली आहे.

देशात टाळेबंदी सुरू झाल्यानंतर पहिल्या २० दिवसांपर्यंत करोनाचा शिरकाव न झाल्याने सोलापूरकर निश्चिंत होते. पूर्व भागापासून सुरुवात झालेला करोनाचा कहर थोडय़ाच दिवसांत दक्षिण भागातही पोहोचला. हा साराच भाग दाटीवाटीच्या झोपडपट्टय़ांनी वेढलेला. विडी, यंत्रमाग आणि कापड उद्योगातील गरीब कामगारांच्या वसाहती असलेल्या या भागात मुळात गरिबी, अज्ञान, दारू-शिंदीची व्यसनाधीनता, आरोग्याविषयीची अनास्था, गुन्हेगारी या गोष्टी परंपरेने चालत आलेल्या. करोनाचा सर्वाधिक फटका प्रामुख्याने याच भागाला बसत आहे. आतापर्यंत एकटय़ा पूर्व भागातच एकूण रुग्णांच्या निम्मे म्हणजे सुमारे पाचशे रुग्ण सापडले आहेत. मृतांची संख्या तेवढीच जास्त आहे.

‘सारी’ने ३५ जण दगावले

करोना भयसंकट सुरू झाल्यापाठोपाठ ‘सारी’ची साथही झपाटय़ाने पसरली आहे. आतापर्यंत करोनामुळे झालेल्या ९० मृत्यूंपैकी जवळपास ३५ मृत्यू ‘सारी’मुळे झाल्याची नोंद आहे. पाच्छा पेठ, शास्त्रीनगर, बापूजीनगर, नीलमनगर, आकाशवाणी केंद्राजवळील गवळी वस्ती, भारतरत्न इंदिरानगर, कुमठा नाका, मोदीखाना, बुधवार पेठ आदी १५ पेक्षा अधिक भाग अतिधोकादायक ठरले आहेत. आजमितील सुमारे १५० प्रतिबंधित क्षेत्रांत करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न होत असले तरी आव्हान वरचेवर वाढतच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *