Maharashtra Politics | अमित शहा न आल्याने शिंदे गटात अस्वस्थता ; तर मुख्यमंत्री बदलाची चर्चा कायम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ एप्रिल । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याने शिंदे गटातील अस्वस्थता वाढली आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीने मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम लावण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न होता. मात्र, ऐनवेळी अमित शहा यांचा नागपूर दौराच रद्द झाल्याने या प्रयत्नांना तूर्तास तरी खीळ बसली आहे. त्यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता आणखी काही काळ अनुत्तरितच राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा, अजित पवार यांच्या निमित्ताने दिले जाणारे राजकीय भूकंपाचे इशारे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले. एकनाथ शिंदे यांनी थेट साताऱ्यातील गावी मुक्काम ठोकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी रात्री दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा सुरू झाली. सुट्टीवर गेलेले मुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्यातून थेट नागपूर गाठत अमित शहांची भेट घेणार होते. शहा, शिंदे आणि फडणवीस अशी ही भेट होणार होती. या बैठकीत मुख्यमंत्रिपदासह राजकीय समीकरणांबाबत काही खुलासा शिंदे करून घेऊ शकले असते. मात्र, शहांचा दौराच रद्द झाल्याने आता ही शक्यताही लांबणीवर पडली आहे.

अमित शहा यांचा दौरा अचानक रद्द झाल्यावरूनही तर्कवितर्क लढविले जात आहेत. शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांच्या निधनामुळे दौरा नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू होणार असल्याची सूचना बुधवारी सायंकाळी पाठविण्यात आली. त्यानंतर गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास हा दौरा रद्द समजण्यात यावा, अशा सूचना आल्या. बादल यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरातील उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांनी टाळल्याच्या चर्चा होत्या.

अमित शहा दिवसभर दिल्लीतील निवासस्थानीच
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही कामे पूर्ण करायची असल्याने अमित शहा आज दिवसभर दिल्लीतील आपल्या शासकीय निवासस्थानीच होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय, नागपूरचा दौरा त्यांच्या यादीत अंतिम करण्यात आला नव्हता, असा दावाही सूत्रांनी केला आहे.
भाजपचे सर्व लक्ष सध्या कर्नाटकाकडे केंद्रित असल्यामुळे महाराष्ट्रातील विषयावर सध्यातरी समर्पक उत्तर नाही. त्यामुळे नागपुरातील बैठकीने काही ठोस निष्पन्न होण्याची शक्यता गृहित धरून स्थिती जैसे थे ठेवण्याचा पर्याय भाजपश्रेष्ठींना स्वीकारला. पण, त्यामुळे शिंदे गटातील धाकधूक आणि अस्वस्थता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *