महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ मे । मराठी मनोरंजन विश्वात सध्या चर्चा आहे ती म्हणजे ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाची. केदार शिंदे दिग्दर्शित हा सिनेमा 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सध्या जोरदार प्रतिसाद मिळत आहेत.
या चित्रपटात शाहीर साबळेंच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी झळकत आहे. तर केदार यांची मुलगी सना शिंदे शाहीर साबळे यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहेत. याशिवाय निर्मिती सावंत, शुभांगी सदावर्ते, अतुल काळे, अश्विनी महांगडे अशी तगडी स्टार या चित्रपटात आहे.
सध्या विविध सेलेब्रिटी, कलाकार आणि प्रेक्षकही या चित्रपटा विषयी भरभरून बोलत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्र शाहीर सिनेमा पाहायला हजेरी लावली. हा चित्रपट पाहून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सिनेमा प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झालाय. महाराष्ट्र शाहीर सिनेमाला सामान्य प्रेक्षकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी हजेरी लावली आहे. नुकतेच शरद पवारही सपत्नीक महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पाहायला आले होते. मुंबई पेडर रोड येथील ‘एनएफडीसी’ या चित्रपटगृहात ते आले होते.
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. चित्रपटाच्या सर्व टीमने शरद पवार यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी केदार शिंदे व त्यांची बेला शिंदे मुलगी सना शिंदे, अंकुश चौधरी आणि सर्व टीम हजर होती.
यावेळी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार म्हणाले, ”शेवटचं गाणं सुरु झालं आणि मी अंकुशला पूर्णतः विसरून गेलो. मला फक्त शाहीर साबळे दिसले,” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.