साहेबांच्या डोळ्यांदेखत नवा अध्यक्ष झाला तर नकोय का? : अजित पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३ मे । शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा करताच यशवंतराव चव्हाण सभागृहात जमलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सारेच नेते जागीच थिजले, थबकले. या निर्णयाचा जराही धक्का बसला नाही अशा पवार कुटुंबाच्या सदस्यांपैकी एक होते विरोधी पक्षनेते अजित पवार.

सारे नेते, पदाधिकारी धाय मोकलून शरद पवारांची मनधरणी करत असताना अजित पवारांनी मात्र या निर्णयाचे समर्थन करून सर्वांनाच आणखी एक धक्का दिला. हा निर्णय कुटुंबात चर्चा करून झाला आहे, असे संकेत देतानाच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भावना व्यक्त करण्यास सरसावलेल्या सुप्रिया सुळेंनाही त्यांनी पवारांच्या राजीनाम्यावर बोलण्यापासून रोखले.

यशवंतराव चव्हाण सभागृहातील वातावरण भावनाचिंब होते. बोलणारा प्रत्येक नेता गहिवरला होता. अनेकांना अश्रू आवरता येत नव्हते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलता बोलता दोन-तीनवेळा रडू कोसळले आणि बाजूला बसलेल्या अनिल देशमुखांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी या वातावरणातील हवाच काढून घेणारे तडाखेबंद भाषण ठोकले. अजित पवार म्हणालेे, हा निर्णय खरे तर 1 मे रोजीच जाहीर केला जाणार होता. मात्र, तसे केले असते तर बीकेसीत झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरील फोकस इकडे फिरला असता. म्हणून शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा आज या प्रकाशन समारंभात केली.

हे कधी तरी होणारच होते. शरद पवारांच्या वयाचा विचार करता एका नव्या नेतृत्वाकडे आपण जबाबदारी देण्याचा विचार करत आहोत. शरद पवार परिवाराचे प्रमुख म्हणूनच काम करणार आहेत. त्याबद्दल शंका असण्याची गरज नाही. उगाच तेच तेच सांगू नका. ‘साहेबांच्या डोळ्यांदेखत नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको रे,’ असा सवालही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केला.

पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवार राजीनामा देत असले, तरी ते पक्षाला मार्गदर्शन करत राहतील. त्यामुळे त्यांच्या पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त होण्याच्या निर्णयावर भावनिक होण्याची गरज नाही. आपण सर्व जण एक परिवार आहोत. शरद पवार कुटुंबप्रमुख म्हणून यापुढेही काम करत राहतील. जो नवा अध्यक्ष निवडला जाईल त्यास शरद पवारांचे मार्गदर्शन मिळेल आणि संपूर्ण पक्षाचाही त्याला पाठिंबा राहील, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली.

कार्यकर्ते, पदाधिकारी भावनाव्याकुळ होते, निवृत्तीचा फेरविचार करा म्हणून शरद पवारांना गळ घालत होते आणि अजित पवार मात्र त्यांना खडसावताना दिसले. जोपर्यंत पवार आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत मी येथेच उपोषणाला बसतो, असा दोनवेळा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला. त्यामुळे आधीच घोषणाबाजी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणार्‍या अजित पवार यांचा पारा चढला. ते म्हणाले, बसायचे तर खुशाल बस; पण सारखे सारखे बोंबलू नकोस!

कार्यकर्त्यांनी अजित पवारांना विनंती केली की, तुम्ही बोला. साहेब तुमचे ऐकतील, तुम्ही विनंती करा. यावर स्पष्ट नकार देत शरद पवारांना विनंती न करण्याचे कारणही अजित पवारांनी दिले. ते म्हणाले, अरे वेड्यांनो, तुम्ही विनंती करू शकता. मी आणि सुप्रिया बोलायला लागलो, तर आम्हाला म्हणतील बस खाली. आम्हाला पवारसाहेब बोलू देणार आहेत का?

सुप्रिया, तू बोलू नको!

शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहून कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांनी बोलावे, अशी विनंती करू लागले. मात्र, यावेळी अजित पवारांनी माईक हातात घेत, सुप्रिया, तू बोलू नको, असे बजावले. यावर काहींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली असता, तिचा मोठा भाऊ म्हणून मी अधिकाराने सांगतोय. बाकीच्यांनी गप्प बसावे, असेही अजित पवारांनी खडसावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *