शरद पवार निवृत्तीवर ठाम : 5 मे रोजी ठरणार राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ मे । राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांनी मनधरणी करूनही निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत. केवळ दोन दिवसांची मुदत मागून त्यांनी कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. काही कार्यकर्ते व ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. आता समितीची ५ मे रोजी बैठक होईल. तीत नव्या पक्षाध्यक्षांचा निर्णय होऊ शकतो. निवड समितीतील अनेक नेत्यांची सुप्रिया सुळे यांच्या नावास पसंती आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी पक्षातील नाराजीनाट्यही समोर आले. मुंबईत बैठकांचे सत्र सुरू असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुण्यात होते. पत्रकारांनी विचारले असता “मला बैठकीचे काहीच माहिती नाही. कदाचित मला बोलावण्याची गरज वाटली नसेल,’ अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली. ही बातमी पसरल्यावर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी सारवासारव केली. बैठका नियोजित नव्हत्या, मन वळवण्यासाठी पवारांशी फक्त चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

छगन भुजबळ : सुप्रिया सुळेंना केंद्रात व अजितदादांना राज्यात जबाबदारी द्यावी, असे माझे वैयक्तिक मत आहे.

प्रफुल्ल पटेल : अध्यक्षपदाच्या स्पर्धेत यांचेही नाव आहे. पण पत्रकार परिषदेत त्यांनी या शक्यतेचा स्पष्ट इन्कार केला.

अजित पवार : राष्ट्रीय राजकारणात रस नाही. पवारांच्या निवृत्तीचे समर्थन करताना आपण नव्या नेत्याला जबाबदारी देऊ पाहतोय, असे सांगत होते. याचा अर्थ ते इतर कुणाबद्दल तरी बोलत होते.

सुप्रिया सुळे : दोन दिवस खूपच शांत. नेतृत्वाबाबत बोलणे टाळले. वेळोवेळी कार्यकर्त्यांची चौकशी करताना दिसल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *