शरद पवारांच्या आक्षेपांना उद्धव ठाकरे सडेतोड उत्तर देणार : संजय राऊत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ मे । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पवार यांच्या आक्षेपांसह सध्याच्या घडामोडींवर प्रदीर्घ मुलाखतीतून सडेतोड उत्तर देणार असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे गट) नेते, खा. संजय राऊत यांनी दिली.

शरद पवार यांनी आपल्या आत्मकथेत उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवरून नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री असताना मंत्रालयात दोनदा जाणे हे पचनी पडणारे नव्हते, बाळासाहेबांसोबतच्या संवादातील सहजता उद्धव यांच्यासोबतच्या बोलण्यात नव्हती, असे विविध आक्षेप शरद पवार यांनी आपल्या आत्मकथेत नोंदविलेले आहेत. त्यावर आता उद्धव ठाकरे या सर्व प्रश्नांवर आणि शंकांवर सडेतोड उत्तर देतील. पक्षाच्या मुखपत्रात लवकरच त्यांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांसंदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर संजय राऊत म्हणाले की, मी पुस्तक पूर्ण वाचले नाही. आत्मचरित्रात अनेक गोष्टी येत असतात. त्या व्यक्तिगत भूमिका असतात, लोकांच्या भूमिका नसतात. या विषयावर माझी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. लवकरच या सर्व घडामोडींवर पक्षाच्या मुखपत्रातून प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. त्यात तुम्हाला या सर्व प्रश्नांची किंवा ज्या शंका उत्पन्न झालेल्या आहेत त्यावर सडेतोड उत्तरे मिळतील, असे राऊत म्हणाले. शरद पवार यांच्या आत्मकथेत काही आक्षेपार्ह असेल, तर जे संबंधित लोक असतील ते उत्तर देतील. प्रत्येकाची वेगळी बाजू आणि भूमिका असते. ती बाजू मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. शरद पवारांबाबत ज्या भूमिका आहेत ती उद्धव ठाकरे आपल्या मुलाखतीतून मांडणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *