बृजभूषण तुरुंगात जाईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार! जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचा निर्धार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ मे । बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप करीत जंतरमंतरवर बसलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा बुधवारचा अकरावा दिवस होय. राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण हे तुरुंगात जाईपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असा निर्धार कुस्तीपटूंनी केला आहे.

विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया या ऑलिम्पिक कुस्तीपटूंनी सुरू केलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. कुस्तीपटूंच्या सुरक्षेसाठी, कुस्तीला वाचविण्यासाठी, कुस्तीच्या भविष्यासाठी सुरू केलेले हे आंदोलन म्हणजे आरपारची लढाई आहे. बृजभूषण यांची ‘डब्ल्यूएफआय’वरील एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहू, असा निर्धार बजरंग पुनियाने व्यक्त केला.

विनेश फोगाट म्हणाली, तीन महिन्यांपूर्वी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आंदोलन थांबविले होते, मात्र बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. चौकशी समितीचा अहवाल जाहीर न होताच त्यांनी पुन्हा ‘डब्ल्यूएफआय’चा कारभारही सुरू केला होता. त्यामुळे आम्हाला पुन्हा नाइलाजाने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. बृजभूषण आता पदावरून हटले नाही तर पुन्हा कोणीच त्यांच्या अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे धाडस करणार नाही. त्यामुळे आम्हाला हे आंदोलन यशस्वी करायचे आहे.

अखेर पी. टी. उषांचा पाठिंबा

आयओएच्या पी. टी. उषा यांनी आधी महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर टीका केली होती, मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे पी. टी. उषा यांनी आज आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची जंतरमंतरवर जाऊन भेट घेतली व त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. ‘पी. टी. उषा आता आमच्या बरोबर आहेत. त्यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याचे वचन दिले आहे, असे बजरंग पुनियाने सांगितले.’

बृजभूषण सिंह हे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होते आणि अजूनही आहेत. आम्हाला कुस्तीसाठी 6-7 महिने कॅम्पमध्ये राहावे लागते. जर मी बृजभूषण यांना माझ्या लग्नाला निमंत्रित केले नसते तर मी कॅम्पमध्ये राहू शकले असते का? याची कल्पना करा. समजतंय ना? त्यांची ताकद खूप मोठी आहे. जर त्यांना निमंत्रण दिले नसते तर काही उलटेही होऊ शकते,’ अशा शब्दांत साक्षी मलिकने भीती व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *