महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मे । शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाला नवं नेतृत्व देण्यात अपयशी ठरल्याची टीका पक्षाचं मुखपत्र सामनातून केली. यानंतर शरद पवारांनी सामनाच्या अग्रलेखाला महत्त्व देत नसल्याचं वक्तव्य केलं. आता पवारांच्या याच टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते बुधवारी (१० मे) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “चांगली गोष्ट आहे, शरद पवार सामनाला महत्त्व देत नाही म्हणाले. मात्र, मी कुठे म्हणतो सामनाला महत्त्व द्या. शरद पवार आमच्या सर्वांचे नेते आहेत.”
“त्यांनी राज्याच्या राजकारणाविषयी थोडं समजून घ्यावं”
सुनिल तटकरेंनी राऊतांच्या वक्तव्यांमुळे महाविकासआघाडीत अडचणी निर्माण होत असल्याची टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “त्यांनी राज्याच्या राजकारणाविषयी थोडं समजून घेतलं पाहिजे. सामना मागील ४० वर्षांपासून राज्यातील राजकारणाविषयी आपलं मत नोंदवत आहे.”
“त्यांच्याबरोबर इतर कुणी नव्हतं तेव्हा सामनाच त्यांच्या…”
“त्यांच्याबरोबर इतर कुणी नव्हतं तेव्हा सामनाच त्यांच्या नेत्यांच्या समर्थनार्थ उभा होता. जर कुणाला त्यांचं मत मांडायचं असेल तर मांडू द्या. जर त्यांना काही चुकीचं वाटत असेल तर त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी समोर येऊन त्यांची बाजू मांडावी. आम्ही त्यांना कुठं रोखलं आहे. मी माझ्या पक्ष, राज्य आणि देशाविषयी बोलतो. यात त्यांचं पोट दुखण्याचं कारण नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
“त्यांनीही बोलण्याची हिंमत दाखवावी”
“मी माझ्या पक्षाची भूमिका आणि मतं मांडतो. त्यांनीही त्यांचं काही मत असेल, विचारसरणी असेल तर मांडावी. त्यांना कुणीही रोखलेलं नाही. त्यांनी बोलत रहावं, बोलण्याची हिंमत दाखवावी,” असंही राऊतांनी नमूद केलं.