महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मे । राज्य सरकार हरियाणाच्या परिवार पेहचान पत्र (PPP) च्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारचे ओळखपत्र देण्याची योजना आखत आहे. ज्या अंतर्गत लोक सरकारच्या सर्व कल्याणकारी सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत.
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार हे येत्या काही महिन्यांत राज्यातील सर्व कुटुंबांसाठी ‘परिवार पहचान पत्र’ (PPP) देण्याच्या विचारात आहे. जेणेकरून प्रत्येक कुटुंबाची आणि प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण माहिती सरकारकडे असेल आणि शासकीय योजनांचा लाभ कुटुंबांना सहज मिळू शकेल.
परिवार पहचान पत्र या योजनेची संपूर्ण ब्लू प्रिंट जवळपास तयार असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीची वाट पाहिली जात आहे. या कौटुंबिक ओळखपत्रावर कुटुंबातील सर्व सदस्यांची संपूर्ण माहिती असेल. तसेच लोक सरकारपासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवू शकणार नाहीत.
कार्डमध्ये कुटुंबांशी संबंधित डेटासह युनिव्हर्सल डेटाचा समावेश असणार आहे. तज्ज्ञ समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलेल्या अहवालानंतर राज्य मंत्रिमंडळ येत्या काही महिन्यांत ही योजना आणण्याची शक्यता आहे. या योजनेत ३० दशलक्षाहून अधिक कुटुंबांचा डेटा गोळा करणे अपेक्षित आहे.