महाराष्ट्र २४ – ऑनलाईन- विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून गर्दी टाळण्यासाठी सोहळ्याचे सोशल मीडियाद्वारे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासाठी समितीचे पदाधिकारी छत्रपती शिवरायांचा अखंड जयघोष करत सकाळी रायगडाकडे रवाना झाले .शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राजसदरेवरील नगारखान्यात जवळ गडकऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक गडपूजनाने स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी गडदेवता शिरकाई देवीसमोर पारंपरिक गोंधळ घालण्यात आला. शनिवारी म्हणजेच सहा जूनला मुख्य दिवशी सकाळी ध्वजारोहण पालखी सोहळा आणि राजसदरेवरील मेघडंबरीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक होणार आहे.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव उत्सव समितीच्या वतीने गेल्या 13 वर्षांपासून किल्ले रायगडावर दिनांक 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. वर्षानुवर्षांचा पुरातत्व खात्याचा विरोध झुगारून याच समितीने ऐतिहासिक मेघडंबरीत शिवरायांची मूर्ती विराजमान केली. आज हा सोहळा लोकोत्सव बनला आहे. दरवर्षी लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत सोहळा दिमाखात साजरा होतो गडावर शिवमय वातावरण निर्माण होऊन सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात शिवछत्रपतींचा जयघोष होतो. पण यंदा या संकटामुळे हा सोहळा साधेपणाने आणि मोजक्याच शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत साजरा होणार असल्याचा निर्णय मार्गदर्शक करवीरचे युवराज आणि खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी घेतला होता. तसेच ‘शिवराज्याभिषेक घराघरात’ या संकल्पने खाली शिवभक्तांनी घरोघरी सोहळा साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. या सोहळ्याची तयारी संभाजीराजे आणि युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
समितीचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे. त्यानुसार शुक्रवारी पहाटेच ऐतिहासिक भवानी मंडपात येथून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ‘जय भवानी जय शिवाजी’ ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’ असा अखंड जयघोष करत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, विनायक फाळके, संजय पोवार, प्रवीण पोवार सोमनाथ लांबोरे, प्रविण हुबाळे सत्यजित आवटे, राहुल शिंदे, सागर दळवी, अमर पाटील, योगेश केदार, दयानंद हुबाळे, अमर जुगर, दीपक सपाटे, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुर्गराज रायगडाकडे रवाना झाले.
संध्याकाळी पाचच्या सुमारास राजसदरे समोरील नगर खांद्याजवळ गडकऱ्यांच्या उपस्थित पारंपरिक गड पूजनाने शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. गडदेवता शिरकाई देवीसमोर यावेळी पारंपरिक गोंधळ करण्यात आला. यावेळी शिवकालीन मर्दानी खेळांचा शिवरायांवरील पोवाड्यांमुळे वातावरण भारावले होते.