Nana Patekar : नाना पाटेकरांचा सर्वसामान्य नागरिकांना लाख मोलाचा सल्ला , राजकारणापासून …..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ मे । सामूहिक प्रयत्नांतून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती केल्यास नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन अभिनेते नाना पाटेकर (Actor Nana Patekar) यांनी तळदेव येथे केले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीच्या दुरुस्तीसाठी नाम फाउंडेशनच्या मदतीने ८५ गावांतील १८०० शेतकऱ्यांची ९०० एकर शेती आणि २० किलोमीटर नदी व ओढे दुरुस्तीचे काम झाले. या कामाचा लोकार्पण सोहळा नाम फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, इंद्रजित देशमुख, चंद्रशेखर एल. एस., क्षिप्रा माथूर, संजय नाईक प्रमुख म्हणून उपस्थित होते.

पाटेकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती करावी. राजकारणापासून सामान्य माणसांनी दूर राहावे. राजकीय लोकांकडून विकास करून घ्यावा. समाजासाठी प्रत्येक माणसाने योगदान द्यावे. मला काय मिळते यापेक्षा मी काय देतो, याचा विचार करावा. १०५ गाव या सामाजिक संघटनेचे काम चांगले आहे. भविष्यात आपण समाजोपयोगी काम करू.’’ या वेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत गप्पा मारत प्रश्न समजून घेतले. तळदेव हायस्कूलमध्ये डिजिटल क्लासरूमचे उद्‌घाटन पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी कोयना, सोळशी, कांदाटी आणि बामणोली विभागातील शेतकरी, शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नाम फाउंडेशनचे समन्वयक गणेश थोरात, घनश्याम सकपाळ, कार्याध्यक्ष डी. के. जाधव, उपाध्यक्ष सुभाष सोंडकर, सचिव गणेश उतेकर, बी. व्ही. शेलार, किसन जाधव, वसंत शिंदे, जगन्नाथ मोरे, हरिभाऊ कदम, लक्ष्मण जाधव, संजय उतेकर, शांताराम कदम, गोविंद शिंदे, सोमराज शिंदे, राजेश जाधव आदींनी परिश्रम घेतले. संजय संकपाळ आणि संजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संदीप उतेकर यांनी आभार मानले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *