महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ मे । पिंपरी-चिंचवड शहरातील परवानाधारक अधिकृत आणि न्यायालयात गेलेल्या 434 अनधिकृत होर्डिंगचालक व मालकांनी मुदतीमध्ये स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला सादर केलेले नाही. अशा 1 हजार 106 होर्डिंगवर कारवाई करून ते तात्काळ पाडण्यात येणार आहेत, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शुक्रवारी (दि.12) सांगितले. कारवाईस विरोध करणार्यांची गय केली जाणार नसून, त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरात महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने परवानगी दिलेले एकूण 1 हजार 318 जाहिरात होर्डिंग आहेत. त्यात खासगी जागेवरील सर्वांधिक 1 हजार 287 तर, महापालिका जागेतील 33 होर्डिंग आहेत.
किवळे येथील अनधिकृत होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. तर, 3 जण गंभीर जखमी झाले. त्या घटनेनंतर दुसर्या दिवशी 18 एप्रिलला आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील सर्व परवानाधारक होर्डिंगमालकांना पुढील 15 दिवसांत स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखल देण्याची मुदत देण्यात आली होती. तसे, जाहीर प्रकटन वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच, होर्डिंगमालक व चालकांची बैठक घेऊन आयुक्तांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या.
एक हजार 287 पैकी केवळ 480 होर्डिंगमालकांनी शुक्रवार (दि.12) पर्यंत स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे सादर केला आहे. उर्वरित 838 होर्डिंगवर पालिका कारवाई करणार आहे. तसेच, मुंबई उच्च न्यायालयात गेलेल्या 434 होर्डिंगचालकांना स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला सादर करण्यासाठी 8 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यात प्रत्यक्ष 320 होर्डिंग उभे आहेत. शुक्रवर (दि.12) पर्यंत केवळ 114 होर्डिंगचालकांनी तो दाखला सादर केला आहे. तर, उर्वरित तब्बल 268 होर्डिंगचा दाखला देण्यात आलेला नाही.
किवळेसारखी पुन्हा दुर्घटना घडू नये म्हणून पालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. मुदतीमध्ये स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला न देणार्या सर्व 1 हजार 106 होर्डिंगवर कारवाई केली जाणार आहे. प्रथम अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होईल. चौकातील आणि वर्दळीच्या ठिकाणचे होर्डिंग सुरुवातीला तोडण्यात येणार आहेत. त्यानंतर इतर आणि परवानाधारक होर्डिंगवर कारवाई होईल.
यासंदर्भात आकाशचिन्ह विभागास आदेश देण्यात आले आहेत, असे अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत 94 होर्डिंग पाडण्यात आले आहेत. त्यातील 30 होर्डिंग पालिकेने पाडले असून, 64 होर्डिंग मालकांनी स्वत:हून काढून घेतले आहेत.