Heat wave: घराबाहेर पडताना सावधान! पुढचे काही दिवस काळजीचे, राज्यात उष्णतेची लाट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ मे । राज्यात मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे तापमानातकाही अंशी घट झाली होती. दरम्यान मागच्या चार दिवसांत राज्याचा पारा तापल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात सूर्य आग ओकत असल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. बाजारपेठ भागातील रस्ते दुपारी निर्मनुष्य होत आहेत. अशातच आता उष्णतेची लाट पुढचे तीन दिवस कायम राहणार असल्याचं समोर आलं आहे.

तापमान वाढीचा पारा राज्यात झपाट्याने वर जात असून ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा पार झाला आहे. सर्वात उच्चांकी तापमान भुसावळ येथे नोंदवण्यात आलं आहे. हॉटसिटी भुसावळातील तापमानाचा पारा एप्रिल महिन्याच्या अखेरीस 36 अंशांपर्यंत घसरला होता. तर गेल्या रविवारी तापमान 40.5 अंशांवर होते. सोमवारपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.

दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागणार आहेत. या आठवड्याची अखेर आणि पुढील आठवड्याची सुरुवात उष्णतेच्या लाटेसह होणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्येही उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

यावेळी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वातावरण असं होतं की, जणू फेब्रुवारी चालू आहे. मात्र, आता उष्णतेने हैराण करण्यास सुरुवात केली असून तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. राज्याशिवाय देशभरातील इतर राज्यांमध्येही हिच स्थितीत आहे. राजस्थानमध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शुक्रवारी राजधानी दिल्लीत 42.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, जो या हंगामातील सर्वात उष्ण दिवस होता. याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणामध्येही पारा चढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *