महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ मे । नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून यंदा तीन ते चार दिवस उशिराने म्हणजेच 4 जूनच्या आसपास केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार, मान्सूनचे आगमन चार दिवस लांबण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
दीर्घकालीन मान्सून आगमनाच्या वेळा लक्षात घेता तो साधारणपणे 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होत असतो. त्याचे आगमन सात दिवस आधी किंवा उशिराने होऊ शकते. मान्सूनचे केरळातील आगमनाचे अंदाज वर्तविण्यासाठी वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण, चीनच्या दक्षिण समुद्रातून होणारा किरणोत्सर्ग, आग्नेय हिंदी महासागरात खालच्या थरात वाहणारे वारे, वायव्य प्रशांत महासागरातील समुद्रसपाटीलगतचा हवेचा दाब, ईशान्य हिंदी महासागरात वरच्या थरात वाहणारे वारे हे सहा घटक विचारात घेण्यात आले आहेत.
भारतीय हवामान विभागाने मागील काही दिवसांपूर्वी मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार यावर्षी 96 टक्क्यांच्या आसपास देशात पाऊस होईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यातही चार टक्के पुढे-मागे होईल, असेही सांगण्यात आले होते. दुसरा अंदाज पुढील काही दिवसांत जाहीर होईल. त्यानंतरच मान्सूनचे नेमके चित्र स्पष्ट होईल.
भारतीय हवामान विभागाप्रमाणेच मान्सूनचा अंदाज वर्तविणार्या ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेनेदेखील यंदाचा मान्सून 96 टक्के होण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते.