महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मे । केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC परीक्षेचा निकाल नुकतीच जाहीर झालाय. ही परीक्षा पास होऊन सरकारी अधिकारी होण्याचं लाखो तरुणांचं स्वप्न असतं. पण, खडतर परीक्षा आणि तीव्र स्पर्धेमुळे मोजकेच विद्यार्थी यामध्ये यशस्वी होतात. यावर्षी झालेल्या युपीएससीच्या परीक्षेत पुण्यातीलभाजी विक्रेत्याचा मुलगा सिद्धार्थ किशोर भांगे यानं यश मिळवलंय. सिद्धार्थ दुसऱ्या प्रयत्नात युपीएसी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालाय.
सिद्धार्थ हा पुण्यातील खराडी वस्तीमध्ये राहतो. त्याच्या घरची परिस्थिती ही बेताची आहे. त्याचे वडील यापूर्वी रीक्षा चालवत असतं. पण त्यामधून उत्पन्न मिळणं कमी झालं. त्यामुळे त्यांनी नोकरी करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना यश मिळालं नाही. त्यांनी घर चालवण्यासाठी कोरोना काळात भाजी विक्री केली.
‘माझे वडील माझ्यासाठी इतके कष्ट घेत आहेत. तर त्यांच्यासाठी मलाही काही तरी केलं पाहिजे. ही माझीही जबाबादारी होती. मी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मोठी मेहनत घेतली. त्यांच्या कष्टाचं चीज झाल्याचं आज समाधान आहे, अशी भावना सिद्धार्थनं बोलून दाखवली. सिद्धार्थ गेल्या साडेतीन वर्षांपासून युपीएससीची तयारी करतोय. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं समजताच त्याला क्षणभर विश्वासच बसला नाही.
‘माझी खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण झालीय. घरचे देखील खूप खुश आहेत. मी इतका लांबचा पल्ला गाठलाय, यावर क्षणभर विश्वासच बसत नव्हता. या यशानं माझ्यासोबत अभ्यास करणारे मित्र देखील आनंदी झाले असून त्यांना अभ्यासाची नवी प्रेरणा मिळालीय, ‘ असं सिद्धार्थनं सांगितलं.
कधी केली सुरूवात?
सिद्धार्थनं अकरावी-बारावीमध्येच युपीएससीची परीक्षा देण्याचं ध्येय निश्चित केलं होतं. पुण्यातील वाडिया कॉलेजमधून त्यानं राज्यशास्त्र विषयातून पदवी मिळवली. कोरोना काळातच त्यानं यूपीएससीची तयारी सुरू केली होती. मला जे पद मिळेल त्या पदावर मी पूर्ण क्षमतेनं काम करणार असल्याचं सिद्धार्थनं यावेळी सांगितलं.