आता नर्सरीसाठीही लागणार परवानगी; शिक्षणमंत्री केसरकरांची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ मे । ज्युनिअर व सीनिअर केजी, नर्सरी सुरू करताना नियम पाळले जात नाहीत. काेणीही खाेली भाड्याने घेतात आणि विद्यार्थी बसवून नर्सरी सुरू करतात. यावर्षीपासून त्याला चाप बसणार आहे. नर्सरी सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून परवानगी घ्यावी लागेल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षणात मुलांचा पाया घडताे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण अधिक सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही ते म्हणाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयाेजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले, पहिली ते आठवीच्या वर्गातील मुलांच्या वह्या-पुस्तकांच्या ओझ्याचा प्रश्न निकाली काढला आहे.

मुले आता एकच पुस्तक घेऊन शाळेत जातील. पुस्तकात प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे पान जाेडलेले आहे. त्यावर विद्यार्थी टीपा काढतील, त्यावरून शिक्षकांनी उत्तमरीत्या शिकविले आहे का नाही? याचेही मूल्यमापन हाेणार आहे. परीक्षा नसल्याने पहिली ते आठवीतील मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांचे मूल्यमापन कसे करावे? यासह सहावीनंतर त्यांना व्यावसायिक शिक्षण द्यायचे, याचा विचार करीत आहाेत.

गुरुवार ते शनिवार सारखा गणवेश
काही शाळांनी गणवेशाच्या ऑर्डर दिल्या हाेत्या. त्यामुळे उत्पादन थांबवून जे गणवेश तयार आहेत ते शाळांना साेमवार ते बुधवार हे तीन दिवस वापरता येतील. तसेच गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांसाठी सर्वत्र ब्ल्यू शर्ट आणि डार्क ब्ल्यू पँट, बुट, साॅक्स असा गणवेश वापरावा लागणार आहे. कापडाचा दर्जा ठरवून टेंडर काढण्यात येईल. प्रत्येक शाळेपर्यंत कापड पाेहोचविले जाईल. महिला विकास अर्थिक महामंडळ, बचतगटाच्या माध्यमातून गावांतील शासकीय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, साॅक्स, पुस्तके दिली जाणार आहेत, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.


शालेय विद्यार्थ्यांना स्काउट-गाइड अनिवार्य
मुलांना शिस्त लागावी, श्रमाचे महत्त्व कळावे, सामाजिक बांधिलकी विकसित व्हावी, यासाठी शालेय विद्यार्थ्यांना स्काउट-गाइड अनिवार्य करण्यात येणार आहे; तसेच यासाठी शासनाने दिलेले गणवेश वापरता येतील. या कपड्यांवर कवायतही घेतली जाणार असल्याचे मंत्री केसरकर म्हणाले.

स्थगिती उठताच नवीन शिक्षक भरती
शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे; परंतु औरंगाबाद खंडपीठाने सुमाेटाे पाच जूनपर्यंत स्थगिती दिलेली आहे. ही स्थगिती उठल्यानंतर ३० हजार शिक्षक भरती करण्यात येतील. सर्व शाळांना शिक्षक मिळतील, असेही शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *