कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे ; राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन

Spread the love

Loading

शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – पिंपरी – चिंचवड । दि.९ । विशेष प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवडसह राज्यात कोविड-19 रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून शाळा- महाविद्यालये सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. परिणामी, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याशिवाय शाळा किंवा महाविद्यालये सुरू करु नयेत, अशी पालकांची मागणी आहे. त्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्वप्रथम शाळा-महाविद्यालये तत्काळ बंद केली, आता त्या पुन्हा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा लागले. कारण, इस्त्राईलमधील शाळा सुरू करण्याची चूक महागात पडली आहे. इस्त्राईलमधील १२० शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. अवघ्या तीन आठवड्यात या शाळांमधील ३४७ विद्यार्थी व शिक्षक कोरना पिझिटिव्ह झाले आणि संभाव्य धोका ओळखून सरकारने तत्काळ पुन्हा सर्व शाळा बंद केल्या. आज सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्याच वेळ ईस्त्राईलवर आली आहे. पालक चिंताग्रस्त असून, प्रशासनाच्या निर्णयावर संतापले आहेत. शाळा-महाविद्यालये सुरू केल्यास काय परिणाम होतील. याचा दाखला ईस्त्राईलच्या रुपाने बोलका आहे. शाळा सुरू करुन पुन्हा बंद करण्याची वेळ येवू नये.


दुसरीकडे, कोरोना आणि लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे रोजगार आणि नोकरी गेली आहे. दोन महिन्यांचा पगार अनेकांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीत दैनंदिन खर्च कसा भागवायचा याची चिंता पालकांना आहे. अशा परिस्थितीत शाळा-महाविद्यालयांनी शालेय शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा सुरू केला आहे. तसेच, व्हर्च्युअल वर्ग सुरू करुन मोबाईल- टॅब खरेदीसाठी सूचना केल्या जात आहेत.
अपणांस विनंती की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा. तसेच, डोनेशन अथवा विकास निधीबाबत पालकांना शाळा प्रशासनाने वेठीस धरू नये, याची योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
तसेच, राज्य सरकारने शाळा सुरू करुन पालकांची चिंता वाढवू नये. सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तरीही पिंपरी-चिंचवडमधील एकही शाळा भारतीय जनता पार्टी सुरु होवू देणार नाही. अगोदर संसद, विधानसभा, शासकीय सर्व कार्यालये सुरू करा. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, असा इशारा पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.
मुलांचे वर्ष वाया जावू नये; पालकांची अपेक्षा
दरम्यान, शाळा सुरू करुन विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असा निर्णय राज्य सरकारने सध्यातरी घेवू नये. तसेच, शालेय शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करावी. विशेष म्हणजे, मुलांचे वर्ष वाया जाणार नाही. याचाही सरकारने विचार करावा, अशी मागणी पालक संघटनांकडून होत आहे. त्यामुळे राज्य सकारने शाळांबाबत निर्णय घेताना पालक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *