आता हॉटेल, ढाब्यांवर दारु प्यायल्यास होणार कारवाई; अबकारी खात्याची मद्यप्रेमींवर करडी नजर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ जून । हॉटेल आणि ढाब्यांवर विनापरवाना मद्यपान करणे गुन्हा असून, संबंधितांवर दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६८ व ८४ नुसार गुन्हा दाखल होणार आहे. त्यानंतर त्या मद्यपींना अटक करून न्यायालयाकडून दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

दंड न भरल्यास कारावासही होऊन अनेकांचे करिअर अडचणीचे होऊ शकते. याशिवाय, संबंधित हॉटेल आणि ढाबा मालकांवरही कारवाई होईल. त्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. त्यामुळे निपाणी व परिसरात असलेल्या हॉटेल आणि ढाबाचालकांचे धाबे दणाणले आहे.

निपाणी शहर, राष्ट्रीय महामार्ग आणि परिसरात दिवसेंदिवस हॉटेल आणि ढाब्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना मद्यपान होत आहे. अशा हॉटेल मालकासह संबंधित ग्राहकांवर उत्पादन शुल्क विभाग करडी नजर ठेवून कारवाईचा फास आवळणार आहे.

तालुका आणि राष्ट्रीय महामार्गावर १ ते २९ मेदरम्यान विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्या सहा ग्राहकांसह संबंधित हॉटेल मालकावर कारवाई करण्यात आली आहे. मद्यपी आणि हॉटेलचालकांना दोन लाखांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. कारवाईसाठी चिक्कोडी, निपाणी, गोकाक असे विभाग आहेत.

प्रत्येक विभागांतर्गत एक वरिष्ठ निरीक्षक व दोन निरीक्षक, एक सहायक निरीक्षक, तीन जवान व एक चालक अशी टीम आहे. त्यासाठी एक भरारी पथक असून चेकपोस्टवर देखील अवैध दारू वाहतुकीवर कारवाई केली जाते. सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्रामुख्याने ढाब्यावर कारवाई केली जात आहे.


दरमहा पाच लाख लिटर मद्यविक्री
तालुक्यातील दारू दुकानातून दरमहा सरासरी पाच लाख लिटरपर्यंत मद्याची विक्री होते. दुसरीकडे दुकानातून आणून चोरीच्या पद्धतीने जादा रक्कम घेऊन अनेक गावांत विनापरवाना मद्यविक्री केली जाते. अशा व्यक्तींवरही कारवाई होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *