पुण्याचा रिंग रोड आता राजकीय कचाट्यात ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुन । महाविकास आघाडी सरकारच्या काळात रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोडने वेग घेतला होता. मात्र, राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए)च्या रिंग रोडने गती घेतली आहे. दोन्ही रिंग रोडची हालचाल आता राजकीय वळणावर पोहोचल्याचे समोर आले आहे. पुणे शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मागील दहा वर्षांपासून रिंग रोड चर्चेत आहेत. कधी पीएमआरडीए, तर कधी रस्ते विकास महामंडळाचा रिंग रोड मार्गी लागणार असे बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात हे दोन्ही रिंग रोड राजकीय कचाट्यात सापडले आहेत.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सध्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार असताना त्यांनी रस्ते विकास महामंडळाचा रिंग रोड मार्गी लागण्यासाठी अनेक बैठका घेतल्या. त्याकरिता निधीची तरतूद केली होती. हा रिंग रोड दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. या रिंग रोडचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आता दरनिश्चितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

संपूर्ण प्रकल्पासाठी 26 हजार 800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पूर्वमार्ग मावळातील 11, खेड 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील पाच हवेलीतील 11 मुळशीतील 15 आणि मावळमधील सहा गावांतून जाणार आहे. या रिंग रोडचे काम महाविकास आघाडीच्या काळात गतीने सुरू होते. मात्र, मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा हे काम संथगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट थॉरिटी – पीएमआरडीए) हाती घेतलेल्या वर्तुळाकार रस्त्याचा सर्वंकष प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सोलू, निरगुडे ते वडगाव शिंदे या दरम्यान पाच किलोमीटर रस्त्यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव पीएमआरडीएने जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत.

पीएमआरडीएने वर्तुळाकार रस्ता विकसित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला. एकूण 128 कि. मी. लांबीचा हा रस्ता होता. पहिल्या टप्प्यात तो 90 मीटर रुंदीचा होता. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) वर्तुळाकार रस्त्याप्रमाणेच तो 110 रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या रस्त्यावर अनेक ठिकाणी बांधकामांना परवानगी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भूसंपादन करताना अनेक अडचणी येणार असून, खर्चदेखील वाढण्याची शक्यता आहे.

पीएमआरडीच्या कामाला गती
पीएमआरडीएच्या रिंग रोडच्या डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सोलू ते वडगाव शिंदे या दरम्यानच्या पाच किलोमीटर लांबीच्या रिंग रोडचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठीचे भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविले आहेत.
रिंग रोडच्या सुधारित खर्चाला नुकतीच मान्यता मिळाली आहे.

रस्ते विकासाचा रिंग रोड धीरे-धीरे…
फेरमूल्यांकनाचे तक्ते पुन्हा अद्यावत करण्यात येत आहेत. त्यानंतर पुन्हा मान्यता घेऊन किती जमीन संपादित केली जाणार आहे. त्याचा मोबदला किती मिळेल याबाबतची नोटीस पाठविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *