जून महिना उजाडला तरी पिंपरी चिंचवड शहरातील नाल्यांची सफाई अद्याप अपूर्णच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुन । पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नाले 31 मे पर्यंत स्वच्छ करण्यात येतील, असे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, जून महिना उजाडला तरीदेखील, शहरातील सर्व नाल्यांची सफाई झाली नसल्याचे चित्र आहे. शहरात 148 मोठे नाले आहेत. या नाल्यातील सांडपाणी पवना, इंद्रायणी व मुळा नद्यांना जाऊन मिसळते. सर्वच नाले उघडे असल्याने या नाल्यांमध्ये राडारोडा, प्लास्टिक, भंगार, कचरा व टाकाऊ साहित्य टाकले जाते. अनेक नागरिक घरगुती व इतर कचरा या नाल्यांमध्ये टाकतात.

राडारोडा व गाळ साचल्याने नाल्यांचे पात्र अरुंद व उथळ होते. परिणामी, पावसाचे पाणी वाहून नेण्याची त्यांची क्षमता कमी होते. नाल्यातून पाण्यास वाट न मिळाल्याने पावसाचे पाणी साचून ते घर, दुकान आणि हाऊसिंग सोसायटीत शिरते. पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांवर पाण्याची डबकी तयार होतात. त्यामुळे रहदारी ठप्प होऊन वाहतूक कोंडीत भर पडते.

ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्याची सफाई केली जाते. सद्यस्थितीत आठ क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत नाल्यांची 96 टक्के सफाई करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र, अनेक नाल्यांची सफाई अद्याप करण्यात आलेली नाही. काही ठिकाणी संथ गतीने काम सुरू आहे, अश्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. हे काम 31 मे रोजीपर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन होते. मात्र, जून महिना उजाडला तरी, अद्याप 100 टक्के नालेसफाई पूर्ण झालेली नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचे आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाल्यास शहरामध्ये पूरस्थिती ओढवून, शहरामध्ये पाणी तुंबण्याचा धोका निर्माण होवू शकतो.

स्पाइडर मशिनने उर्वरित नाले स्वच्छ करणार
शहरातील नाले सफाईचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू केले आहे. आतापर्यंत नालेसफाईचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. मोठ्या नाल्यासाठी जेसीबी, पोकलेन व इतर यंत्रसामग्रीने सफाईचे काम करण्यात आले. मात्र, ज्या ठिकाणी हे यंत्र जाऊ शकत नाहीत. तेथे स्पाइडर मशिन वापरण्यात येणार आहे. पुणे शहरातून सदर मशिन उपलब्ध होताच त्याचा वापर करून शिल्लक नाले सफाईचे काम पूर्ण केले जाईल. पावसाचे पाणी कोठेही साचू नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *