Odisha Railway Accident : अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय ; आता देशभरातील सिग्नल यंत्रणेचं होणार ऑडिट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुन । बालासोर रेल्वे अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक जण यात जखमीही झाले आहेत. या अपघातानंतर आता रेल्वेकडून मोठी पावलं उचलण्यात येत आहेत. सीबीआय चौकशीची शिफारस केल्यानंतर, रेल्वे मंत्रालयानं आता देशभरातील सिग्नलिंग सिस्टमचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने सर्व महाव्यवस्थापकांना आठवडाभरात चौकशी करून १४ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जेव्हा देशभरात तपास केला जाईल तेव्हा १० टक्के ठिकाणावर वरिष्ठ अधिकारी पुन्हा तपास करतील. याद्वारे सिग्नल यंत्रणा योग्यरित्या कार्यरत आहे का नाही हे तपासलं जाईल. याशिवाय रेल्वे स्थानकांवर लावण्यात आलेल्या हाऊसिंग सिग्नलिंग उपकरणांचा तपास करण्याचेही आदेश देण्यात आलेत.

याशिवाय, रिले रूमची तपासणी केल्यानंतर, दुहेरी सिग्नलिंग यंत्रणा योग्यरित्या कार्यरत आहे का नाही हे पाहिलं जाईल. सिग्नलिंग सिस्टम रिले रूममधूनच नियंत्रित केली जाते. दुसरीकडे, सोमवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी अपघातातील जखमी चालक आणि त्याच्या सहाय्यकांचे जबाब नोंदवले. दोघांवर एम्स-भुवनेश्वरमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी रेल्वे कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी १७० जणांची ओळख पटली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *