‘आयसीसी’ जेतेपदाचे भारताचे लक्ष्य ; आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुन । आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ बुधवारी ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत संघाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात उतरेल, तेव्हा त्यांचे लक्ष्य गेल्या दहा वर्षांपासून दूर राहिलेले ‘आयसीसी’ जेतेपद मिळवण्याचे असेल.

‘डब्ल्यूटीसी’च्या गेल्या दोन चक्रात भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. गेल्या दहा वर्षांत मर्यादित षटकांच्या सर्व मोठय़ा स्पर्धामध्ये बाद फेरीपर्यंत भारताने धडक मारली. मात्र, त्यांना जेतेपद मिळवता आले नाही. भारताने २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक पटकावला होता. त्यानंतर भारताला ‘आयसीसी’ स्पर्धामध्ये तीन वेळा अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तर, चार वेळा त्यांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. संघ २०२१ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीच्या फेरीतच बाहेर पडला. गेल्या ‘डब्ल्यूटीसी’ चक्रात भारताने सहापैकी केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावली. दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडले आणि रोहित शर्मावर संघाची जबाबदारी देण्यात आली. भारतीय संघ मायदेशात अपराजित राहिला. इंग्लंडमधील मालिका त्यांनी बरोबरीत राखली. बांगलादेशविरुद्ध कठीण परिस्थितीतून त्यांनी विजय साकारला. ओव्हल येथील या निर्णायक सामन्याचा निकाल काहीही लागला, तरीही संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा संघाबद्दलचा दृष्टिकोन बदलणार नाही. ‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकणे, इंग्लंडमध्ये मालिका बरोबरीत राखणे, गेल्या पाच-सहा वर्षांत संघाने चांगले प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळले. तुम्ही ‘आयसीसी’ जेतेपद मिळवा किंवा नाही. मात्र, या गोष्टी कधीही बदलणार नाहीत,’’ असे द्रविडने अंतिम सामन्यापूर्वी सांगितले.

’ वेळ : दुपारी ३ वाजता

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *