Weather Update: राज्यात मॉन्सून 16 जूननंतर दाखल होण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुन । महाराष्ट्रात मॉन्सून 16 जूननंतर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील २४ तासांत बिपारजॉय चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात आलंय. या चक्रीवादळामुळेच राज्यात पावसाचं आगमन उशिरा होणार आहे. मात्र, या चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांना धोका नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

आयएमडीनं दिलेल्या इशाऱ्यानुसार या वादळामुळं येत्या 24 तासांमध्ये कोकणचा किनारपट्टी भाग, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी असेल. तर, मुंबई, ठाणे, पालघरमध्येही सोसाट्याचा वारा आणि पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार तीव्र दाबाचा पट्टा 4 किमी प्रतीतास इतक्या वेगानं उत्तरेला पुढे सरकत आहे. सध्याच्या घडीला हे वादळ मुंबईपासून 900 किलोमीटरवर अरबी समुद्रात सक्रिय असल्याचं म्हटलं जात असून, पुढील सहा तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळं वादळाच्या पार्श्वभूमीवर लहान नौका घेऊन मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या मच्छिमार बांधवाना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चक्रिवादळाच्या एकंदर वातावरणामध्ये कर्नाटकचा किनारपट्टी भाग, लक्षद्वीप, मालदीवसह कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये समुद्र 10 जूनपर्यंत उसळलेला असेल.

याचा परिणाम मान्सूनवर होणार असून राज्यात आणि केरळातही मान्सून लांबणीवर पडला आहे. दरम्यान वादळाच्या काळात होणारा पाऊस हा मान्सून नाही ही बाब लक्षात घ्यावी असंही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *