महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी -मुंबईतील दुकाने खुली झाली, पण बिझनेसच नसल्याची तक्रार अनेक दुकानदार करीत आहेत, पण त्याचवेळी खाद्यपदार्थांच्या दुकानांसमोर चांगलीच गर्दी आहे. मिठाई, वडा पाव, फरसाण, पाव भाजी, मिसळची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर चांगलीच गर्दी आहे.
जवळपास तीन महिने रस्त्यावरील चमचमीत पदार्थांपासून मुंबईकर दूर राहिले होते. आता ती कसर भरुन काढली जात आहे. अर्थातच अनेकांना वडा – पाव, मिसळ तसेच मिठाईचा आस्वाद घ्यायचा होता. अर्थातच बहुतेक दुकानदार ग्राहक सुरक्षित अंतराचे पालन करतील याकडे लक्ष देत आहेत तसेच स्वच्छतेस महत्त्व देत आहेत.
मुंबई तसेच उपनगरातील अनेक खाद्यपदार्थांच्या दुकानात सुरक्षित अंतराचे नियम पाळले जात आहेत, त्यामुळे काही दुकानांच्या बाहेर रांगही लागल्याचे चित्र होते. अनेक दुकानदारांनी मागणी वाढत असल्याने दुकानातील स्टॉकही वाढवला आहे. अर्थात त्यांनाही सम – विषम नियमानुसार दुकाने खुली ठेवणे भाग पडत आहे, त्यामुळे काही दुकानदारांनी ताजा स्टॉक उपलब्ध आहे, त्यामुळे आपले दुकान बंद असलेल्या दिवशी ऑर्डर घेऊन घरी माल देण्यास सुरुवात केली आहे.
रेस्टॉरंट बहुतांश बंदच
रेस्टॉरंट तसेच हॉटेलना खाद्यपदार्थांची विक्री करण्यास परवानगी दिली असली तरी मुंबई परीसरातील दोन टक्केच रेस्टॉरंट तसेच हॉटेल खुली जाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना कामगारांचा प्रश्न जाणवत आहे, त्याचबरोबर अनेकांना येथील खाद्यपदार्थ घरी घेऊन जाण्याची कल्पनाच रुचत नाही. त्याचबरोबर अनेक गृह सोसायटीमध्ये बाहेरच्या व्यक्तीस अद्यापही प्रवेश नसल्याने होम डिलिव्हरी अशक्यच झाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबईतील 15 हजार रेस्टॉरंट तसेच हॉटेलपैकी केवळ तीनशे खुली आहेत असे सांगितले जात आहेत.
