महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुन । नरेंद्र माेदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, लाेकसभेला एकत्रित काम करायला हवे. पण, डोंबिवलीतील काही व्यक्ती युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करीत आहेत, असा टोला लगावतानाच मी कल्याणची खासदारकी सोडायला तयार आहे. पण मग त्या जागी तुम्ही तुमचा चांगला उमेदवार सुचवा. मी युतीचे काम करण्यास तयार आहे, अशी आक्रमक भूमिका घेत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी भाजपच्या नेत्यांना सुनावले.
आम्हाला आव्हान देण्याचे काम करू नका. मुख्यमंत्र्यांनी युती करण्याचे पाऊल उचलले नसते, तर काय झाले असते? डोंबिवलीतील काही व्यक्ती जाणीवपूर्वक युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करीत आहेत, असा टोलाही त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. मला कल्याण लोकसभेतील मतदारांनी दोन वेळा निवडून दिले आहे. तुम्ही सांगा, तुमच्याकडे कोणता चांगला उमेदवार आहे, असा प्रश्नही त्यांनी भाजपच्या नेत्यांना केला.
डोंबिवलीत भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्याविराेधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्याविरोधात भाजपने मोर्चा काढला हाेता. मात्र, त्यात शिवसेना सहभागी न झाल्याने युतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यानंतर कल्याणमधील विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी शिवसेनेने लावलेल्या फलकांवरून भाजप नेत्यांचे फोटो वगळल्याने भाजपने कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मदत न करण्याचा ठराव मंजूर केला. त्या पार्श्वभूमीवर शिंदे बोलत होते.
उल्हासनगरातील भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागांत ५५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. शिवसेना-भाजपचे सरकार एका वेगळ्या विचाराने सत्तेवर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चांगले काम सुरू असताना पोलिस अधिकाऱ्याविरोधात कारवाई होत नाही, या क्षुल्लक कारणावरून शिवसेनेला सहकार्य करणार नाही, अशी विधाने विचारपूर्वक केली पाहिजेत, असेही त्यांनी सुनावले.