साडेबारा टक्क्यांच्या परताव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निषेध घोषणांद्वारे मोर्चा काढणारः सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर

Spread the love

Loading

पिंपरीः निगडी येथील महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते येत्या शुक्रवारी सायंकाळी चार वाजता होणार आहे. या पार्श्वभूमिवर साडेबारा टक्के परताव्याच्या मागणीसाठी निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर संविधानिक पद्धतीने निषेध आंदोलन करणार आहेत. यावेळी घोषणाबाजी करून मुख्यमंत्र्यांविरोधात निषेध व्यक्त करणार आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महाराष्ट्र 24 ला दिली.

विशेष बाब म्हणजे ज्या ज्या वेळी सचिन काळभोर साडे बारा टक्क्याच्या परताव्यासाठी निषेध आंदोलन करतात, त्या त्या वेळी निगडी पोलिस त्यांच्यावर विविध प्रकारे दबावतंत्राचा वापर करून त्यांचे आंदोलन होऊनच देत नाहीत. संविधानिक पद्धतीने निषेध आंदोलन करणे हा गुन्हा आहे का, पोलिसांकडून वेळोवेळी मुस्कटदाबी केली जात असल्याचा घणाघाती आरोपदेखील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी यावेळी केला.

महात्मा बसवेश्वर पुतळा समिती व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्राधिकरण निगडी येथे भक्ती शक्ती चौक ते अप्पू घर रोड या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे,आमदार बनसोडे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे उपस्थित राहणार आहेत.

शहरामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवावा अशी मागणी लिंगायत समाजाकडून होत होती. यासाठी पुतळा समितीची निर्मिती करण्यात आली. या समितीने लोक वर्गणीतून महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा बनवून घेतलेला आहे. बारा फूट उंचीचा हा पुतळा असून ब्रॉन्झ धातूने बनवलेला आहे. ईस्टलिंग धारक असा हा पुतळा आहे.

शिल्पकार श्री पंकज तांबे यांनी हा पुतळा बनविला असून यासाठी 27 लाख रुपये खर्च आला आहे. महापालिकेने यासाठी जागा, सीमा भिंत, पुतळ्यासाठी चौथारा, सुशोभीकरण, विद्युत व्यवस्था तसेच गार्डनचे काम करून दिले आहे. यासाठी मनपा सल्लागार मे. शैलेश शहा यांची नियुक्ती केली होती.

सदर पुतळा बसवणे कामी, पुतळा समितीने व महानगरपालिकेने शासनाच्या सर्व मान्यता प्राप्त केले आहे. त्यानंतर पुतळा समितीने म. बसवेश्वर महाराजांचा पुतळा महापालिकेकडे सुपूर्त केला आहे. गेली सहा महिने सदरचा पुतळा हा अनावरणाच्या प्रतीक्षेत होता. त्याचे शुक्रवारी अनावरण होणार आहे, अशी माहिती पुतळा समितीचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *