किशोर आवारे खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कधी सापडणार ? सुलोचना आवारेंचं उपोषण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुन । ‘जनसेवा विकास समिती’चे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खुनाला महिना उलटला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या विशेष चौकशी समितीच्या (एसआयटी) मदतीसाठी आणखी एका पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी आणि हत्येच्या कटात सहभागी असलेल्या सहा जणांना अटक केली आहे. मात्र, कटातील मुख्य सूत्रधार अद्याप फरारी आहे.

आवारे यांच्या खुनामुळे मावळ परिसरात राजकीय वाद विकोपाला गेला. या प्रकरणी गौरव भानू खळदे (रा. तळेगाव), श्याम अरुण निगडकर (वय ४६, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण संभाजी धोत्रे (वय ३२), आदेश विठ्ठल धोत्रे (वय २८, रा. नाणे, ता. मावळ), संदीप ऊर्फ नन्या विठ्ठल मोरे (वय ३२, रा. आकुर्डी) आणि श्रीनिवास ऊर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. माजी नगरसेवक भानू खळदे अद्याप फरारी आहे. त्याच्या मागावर पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली होती; तसेच वाकड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्यासह अधिकाऱ्यांची ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली होती.

बांधकामाच्या जागेवरील झाडे बेकायदा तोडल्याच्या संशयावरून आवारे आणि भानू खळदे यांचा गेल्या वर्षी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयात वाद झाला होता. त्या वेळी आवारे यांनी खळदेच्या कानशिलात लगावली होती. त्या रागातून खळदेचा मुलगा गौरवने आवारे यांच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी त्याने आरोपींना सुपारी दिली. त्यातून १२ मे रोजी दुपारी चौघांनी आवारे यांच्यावर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हल्ला केला.

आवारेंच्या आईचे उपोषण
किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तपास गतीने करण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले; तसेच त्यांनी पोलिस आयुक्तांची भेटही घेतली.

किशोर आवारे खून प्रकरणी नेमलेल्या ‘एसआयटी’ची जबाबदारी सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गुन्हे शाखेची दोन पथके तळेगाव दाभाडे येथे स्थलांतरित करण्यात आली असून, ‘एसआयटी’ला अन्य एका पथकाची जोड देण्यात आली आहे, असं पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *