मेस्सीचा वर्ल्ड कप प्रवास संपला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुन । अर्जेंटिनाला 2022 मध्ये जगज्जेतेपदाचा मान मिळवून देणारा जादूगार लिओनल मेस्सी 2026 फिफा वर्ल्ड कपमध्ये दिसणार नाही. कतारला खेळला गेलेला वर्ल्ड कप माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, असे सांगत मेस्सीने आपला फिफा वर्ल्ड कप प्रवास संपल्याचे सांगितले. म्हणजे मेस्सी वर्ल्ड कपमधून निवृत्त झाला असून 2026 मध्ये होणाऱ्या स्पर्धेत अर्जेंटिनाचे नेतृत्व नव्या खेळाडूच्या हातात असेल आणि त्याच्यावर अर्जेंटिनाचे जगज्जेतेपद राखण्याची जबाबदारी असेल.

सध्या मेस्सीने एका आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यासाठी चीन गाठले आहे. तेथे पत्रकारांशी संवाद साधताना त्याला एका चिनी वृत्तपत्राने एक प्रश्न विचारला, तू 2026 च्या विश्वचषकात खेळणार का? यावर मेस्सी म्हणाला, ‘मला तसे वाटत नाही. कतारला खेळलेला वर्ल्ड कप माझा शेवटचा वर्ल्ड कप होता. मी पुढच्या विश्वचषकाला जाणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगत मेस्सीने आपली वर्ल्ड कप निवृत्तीच जाहीर केली.

मेस्सीने आपल्या कारकीर्दीत 174 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 102 गोल केले आहेत आणि तो अर्जेंटिनासाठी सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा खेळाडूही ठरला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. सक्रिय खेळाडूंमध्ये गोल करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर ख्रिस्तियानो रोनाल्डो (122 गोल) आहे.

मेस्सी खेळणार – स्केलोनी
मेस्सीने 2026 मध्ये वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता नसल्याचे सांगितले असले तरी तो खेळेल, अशी आशा अर्जेंटाइन प्रशिक्षक लिओनल स्केलोनी यांनी व्यक्त केली. त्याच्यासाठी आमचे दरवाजे सदैव खुले आहेत. जर तो खेळणार नसेल तर आम्ही पर्याय शोधू. मला पूर्ण विश्वास आहे तो खेळणार, पण त्याआधी आम्हाला वर्ल्ड कपसाठी पात्र होणे महत्त्वाचे असेल, असेही स्केलोनी म्हणाले.

कोपा अमेरिकानंतर निवृत्तीची शक्यता
मला ज्याची उणीव भासत होती ती मी वर्ल्ड कप जिंकून पूर्ण केली. आता मी माझ्या करिअरबाबत समाधानी आहे. मला पुढील वर्ल्ड कप पाहण्यासाठी तिथे यायचे आहे, पण मी त्यात सहभागी होणार नाही, खेळणार नाही. आगामी वर्ल्ड कप अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडात खेळला जाणार आहे. मेस्सीने वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याचे सांगितले असले तरी तो आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणे सुरूच ठेवणार आहे. मात्र 2024 च्या कोपा अमेरिका स्पर्धेनंतर मेस्सी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून आपली निवृत्ती जाहीर करेल, अशी शक्यता आहे.

मेस्सीचे पाच वर्ल्ड कप
2022 मध्ये कतारमध्ये खेळला गेलेला फिफा वर्ल्ड कप हा मेस्सीच्या कारकीर्दीतील पाचवा वर्ल्ड कप होता. यापूर्वी त्याने 2006, 2010, 2014 आणि 2018 च्या स्पर्धेत भाग घेतला होता. 35 वर्षीय मेस्सीने पाच वर्ल्ड कपमध्ये 26 सामने खेळले असून त्यात 13 गोल केले आहेत.

आज अर्जेंटिना-ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना
बीजिंगमधील वर्कर्स स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना यांच्यातील आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यासाठी मेस्सी चीनमध्ये दाखल झाला आहे. अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया उद्या गुरुवार, 15 जून रोजी आमनेसामने असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *