आरटीओची तत्परता ! शाळा सुरू झाल्यानंतर स्कूल बस तपासणीचा मुहूर्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुन । शाळा सुरू होण्याआधी दर वर्षी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी केली जाते. स्कूल बस अथवा व्हॅनचालकाने दर वर्षी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करणे आवश्यक असते. यंदा शाळा सुरू झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) जाग आली असून, आता स्कूल बस आणि व्हॅन तपासणीसाठी मुहूर्त काढण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुण्यात सध्या नोंदणीकृत चार हजार ५०० स्कूल बस आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ही संख्या तीन हजार आहे. १७ अथवा त्यापेक्षा जास्त आसनक्षमता असलेल्या स्कूल बसची ही संख्या आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनची संख्याही मोठी आहे. यंदा शाळा सुरू झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्कूल बस आणि व्हॅनला योग्यता प्रमाणपत्र देण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी सुटीच्या दिवशीही काम सुरू ठेवण्याची वेळ आरटीओवर आली आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी याबाबत आदेश काढले आहेत. त्यानुसार, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्यासाठी स्कूल बस आणि व्हॅनचे योग्यता प्रमाणपत्र अद्ययावत असणे आवश्यक आहे. विद्यार्थी, शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या सोईसाठी सरकारी सुटीच्या दिवशीही स्कूल बस आणि व्हॅनला योग्यता प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे.

आरटीओकडून विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई केली जाते. याचबरोबर स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी करून त्यांच्याकडे योग्य प्रमाणपत्र आहे की नाहीत, याची तपासणी केली जाते. आरटीओने शाळा सुरू झाल्यानंतर योग्यता प्रमाणपत्र देण्याची मोहीम आती घेतली आहे. यावर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्कूल बस आणि व्हॅनचालक तपासणीच्या नावाखाली एक-दोन दिवस सुट्या घेत आहेत. त्यामुळे पैसे भरूनही मुलांना शाळेत सोडायला आणि आणायला जावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केली.

आणखी वाचा-पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्या, कडधान्य पेऱ्यात मोठी घट शक्य; दुबार पेरणीचेही सावट

स्कूल बस, व्हॅनसाठी आवश्यक बाबी
-स्पीड गव्हर्नर
-वाहन योग्यता प्रमाणपत्र
-विमा प्रमाणपत्र
-अग्निशामक यंत्रणा
-परिचारक

आरटीओने शाळा सुरू झाल्यानंतर योग्यता प्रमाणपत्राची मोहीम घेण्याऐवजी ती उन्हाळी सुटीच्या काळात घ्यायला हवी होती. आधी ही मोहीम पूर्ण झाली असती, तर सर्वांचाच त्रास कमी होण्यास मदत झाली असती. -राजन जुनावणे, अध्यक्ष, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *