महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुन । यंदा मान्सून केरळला ५ दिवस उशिरा आला. त्यानुसार मोसमातील १९ दिवस संपले आहेत. या हंगामात देशाच्या पूर्व व ईशान्य भागात २१%, मध्य भारतात ५६%, दक्षिणेत ६१% कमी पाऊस झाला. तर संपूर्ण देशात हा आकडा ३३% आहे. केवळ उत्तर-पश्चिम भारतातच कोट्यापेक्षा ३७% जास्त पाऊस झाला. यंदा मान्सूनपूर्व पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला. मात्र, गुजरात व राजस्थानात अनुक्रमे १८९% व ३१५% जास्त झाला.
चेन्नईमध्ये शाळा बंद
विदर्भातील काही भागात पारा ४० अंशांवर… ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगड, विदर्भ, कोकण आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काही भागात पारा ४० अंशांवर आहे. उप्रमध्ये अधिक उष्णतेमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आपत्कालीन बैठक घेतली. दक्षिण बंगालमध्येही पारा ४३ अंश होता.
मान्सून का अडकला : मान्सून बिपरजॉयने रोखला आहे. तो १० जून रोजी दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणमार्गे दक्षिण बिहार, मिझोराम, सिक्किमला पोहोचणार होता, पण तो १९ जूनला पोहोचला. सोमवारी मान्सूनची सीमा झारखंडच्या दुमका, बंगालच्या श्रीनिकेतन व कॅनिंग, आंध्रच्या कवालीत पुढे सरकली. तर त्याचे पश्चिम टोक ११ जूनपासून रत्नागिरीमध्येच अडकलेले आहे.
पुढे काय : पश्चिम, मध्य, पूर्व भागात सरासरीपेक्षा जास्त होणार पाऊस
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांच्या मते, पुढील दोन आठवड्यांत देशात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. मान्सूनची बंगालच्या उपसागराची शाखा सक्रिय होत आहे. यामुळे मान्सून २ ते ३ दिवसांत आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागांसह तेलंगण, ओडिशात प्रवेश करेल. तो बिहार, झारखंड व पश्चिम बंगालच्या उर्वरित भागांसह पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचण्याचीही शक्यता आहे.
खासगी संस्था स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष (हवामानशास्त्र व हवामान बदल) महेश पलावत म्हणाले, बिपरजॉय इशान्येकडे सरकत आहे. तो पूर्व भारतात मान्सून पुढे सरकवण्यास मदत करेल. २० जूनपासून मध्य व पूर्व उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या बहुतांश भागात पाऊस होईल.
गुजरात, राजस्थानात सर्वात जास्त मान्सूनपूर्व पाऊस
बिपरजॉयमुळे ८ दिवस अडकलेला दक्षिण-पश्चिम मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे बिहार, दिल्ली, उप्र, तेलंगण, मप्र, झारखंड, छत्तीसगड, प. बंगाल गंगा किनारपट्टी, ईशान्येकडील ८ राज्यांत मुसळधार व संततधार पाऊस होईल. याची सुरुवात काही राज्यांत सोमवारापासूनच झाली.