महाराष्ट्रात मान्सून आला ; २ दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – लक्ष्मण रोकडे – गेल्या तीन-चार दिवसांपासून येणार, येणार म्हणत चकवा देणारा मान्सून गुरुवारी महाराष्ट्रात दाखल झाला. संपूर्ण गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत आनंदसरी बरसल्या. मृगधारा कोसळू लागल्याने शेतकऱ्यांची आता पेरणीची लगबग सुरू झाली आहे. येत्या दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल, असा अंदाज आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी दुपारी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्रातील मान्सून आगमनाची सरासरी तारीख १० जून आहे. यंदा हा प्रवेश एक दिवस उशिराने झाला. कर्नाटकचा उर्वरित भाग, संपूर्ण रायलसीमा, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तेलंगणा, छत्तीसगडचा काही भाग, नागालँडचा मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेशचा काही भाग, आसाम आणि मेघालयाच्या आणखी काही भागांत मान्सून दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन ते तीन दिवस आंध्र प्रदेश, कर्नाटकचा किनारी भाग, तेलंगणा, गोव्यासह कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मुंबईतही जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान अनुकूल
मान्सून गुरुवारी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात दाखल झालेला मान्सून येत्या ४८ तासांत महाराष्ट्राच्या उर्वरित भागात दाखल होईल. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अनुकूल आहे. राज्यात तुरळक मुसळधार पडेल.
– कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *